कोरोना प्रादुर्भाव आणि लॉक डाऊनमुळे कोल्ड्रिंक व्यावसायिकांचा यंदाचा हंगाम वाया गेला असून त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. तेंव्हा सरकारने कोल्ड्रिंक दुकान चालकांना आर्थिक सहाय्य करावे, अशी मागणी बेळगाव कोल्ड्रिंक हाऊस ओनर्स असोसिएशनने मुख्यमंत्र्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
बेळगाव कोल्ड्रिंक हाऊस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष शेखर हंडे यांच्या नेतृत्वाखाली सदर मागणीचे निवेदन मुख्यमंत्र्यांना धाडण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांच्या सहाय्यकांनी निवेदनाचा स्वीकार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. बेळगाव महापालिका हद्दीत सुमारे 50 ते 60 कोल्ड्रिंकची दुकाने आहेत. गेल्या कित्येक वर्षापासून अधिकृत परवाना घेऊन ही दुकाने कोणत्याही कलंका विना चालविली जात आहेत. निवेदन देण्यास कारण की, गेल्या 24 मार्चपासून ते 31 मे 2020 पर्यंत लॉक डाऊन जारी करण्यात आला आहे. या काळात कोल्ड्रिंक दुकाने बंद ठेवण्यात आल्यामुळे दुकानात तयार करून ठेवलेला कोल्ड्रिंग तयार करण्यासाठी आवश्यक असलेला माल नष्ट झाला आहे. यात भर म्हणून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी शीतपेये आणि आईस्क्रीम खाणे थांबवावे, अशी सूचना सरकारने केली आहे. या सर्व गोष्टींमुळे कोल्ड्रिंक दुकानदारांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
याखेरीज गेल्या मार्च महिन्यापासून व्यवसायच झालेला नसला तरी कोल्ड्रिंक दुकानदारांना वीज व पाण्याचे बील, दुकानाचे भाडे आदींचा खर्च मात्र सोसावाच लागणार आहे. शहरातील सर्वच कोल्ड्रिंक दुकानदार हे कनिष्ठ मध्यमवर्गातील असल्यामुळे सध्याच्या परिस्थितीत त्यांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे कठीण झाले आहे. तेंव्हा याची तातडीने दखल घेऊन सरकारने आम्हा कोल्ड्रिंग दुकानदारांना आर्थिक मदत करून दिलासा द्यावा, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.
निवेदन सादर करतेवेळी अध्यक्ष शेखर हंडे यांच्यासह असोसिएशनचे सेक्रेटरी सुरेश बसरीकट्टी, खजिनदार वैजनाथ भोगण, शिवाजी हंडे आदींसह शहरातील सर्व कोल्ड्रिंग दुकानदार उपस्थित होते.