सध्या टी.व्ही.वर रामायण मालिकेचे पुनःप्रसारण प्रसारण केले जात आहे. नवलाची गोष्ट हि आहे कि रामायणात ज्या जंगलामध्ये शबरी राहत होती ते ठिकाण म्हणजे सध्याचे बेळगाव जिल्ह्यातील सुरेबान (ता.रामदुर्ग) हे गाव होय. खुद्द रामायण मालिकेत श्रीरामाची भूमिका करणारे अभिनेते अरुण गोविल यांनी याला दुजोरा दिला आहे.
रामायणात ज्या जंगलमय ठिकाणी शबरी राहत होती ते ठिकाण म्हणजे सध्याचे बेळगाव जिल्ह्यातील सुरेबान (ता.रामदुर्ग) हे गाव होय. सुरेबानचे औपचारिक नाव “शबरी व्हान” असे असून सूरेबाननजीक शबरीचे मंदिर देखील आहे. त्याचप्रमाणे या मंदिराचा परिसर “शबरी कोला” म्हणून सुप्रसिद्ध आहे. याठिकाणी आजही शबरी श्रीरामाची प्रतीक्षा करत असल्याचा लोकांचा विश्वास आहे.
रामायणात कबंध राक्षसाचा जो वध झाला ते कबंध आश्रम देखील बेळगांवातच आहे. बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्गनजीक करडीगुडी येथे हा कबंध आश्रम होता असे मानले जाते. श्रीराम आणि लक्ष्मण या उभयतांनी याच ठिकाणी कबंध राक्षसाचा वध केला. कबंध राक्षस ठार झाल्यानंतर त्याचे रूपांतर गंधर्वामध्ये झाले. या गंधर्वाने स्वर्गाकडे प्रस्थान करण्यापूर्वी श्रीरामाला शबरीच्या आश्रमाला भेट देण्यास सांगितले होते. त्यानंतर “शबरीची बोरं” ही आपल्याला ज्ञात असलेली कथा घडली.
दरम्यान, यासंदर्भात सोशल मीडियाच्या माध्यमातून बोलताना रामानंद सागर यांच्या “रामायण” या गाजलेल्या मालिकेतील श्रीरामाची भूमिका करणारे अभिनेते अरुण गोविल यांनी रामायणातील पंचवटी, निशिगंध पर्वत, शबरी आश्रम ही ठिकाणे आज देखील अस्तित्वात असल्याचे सांगितले. या ठिकाणांपैकी शबरीचे वास्तव्य असलेले ठिकाण आणि निशिगंध पर्वत कर्नाटकात असल्याचे सांगताना त्यांनी बेळगावचा आवर्जून उल्लेख केला. सध्याच्या बेळगावनजीक एके ठिकाणी शबरीचे वास्तव्य होते. सध्या तेथे राहणारे लोक अत्यंत नशीबवान आहेत, की जे श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत राहत आहेत. याठिकाणी श्रीरामांनी शबरीसह अनेकांचा उद्धार केला आहे असेही अभिनेते अरुण गोविल यांनी सांगितले.