कर्नाटक राज्यामध्ये मंगळवार दि. 28 एप्रिल रोजी कोरोना संक्रमणाचे 8 नवे रुग्ण आढळून आल्यामुळे राज्यातील कोरोना बाधित यांची संख्या 520 इतकी वाढली आहे. नव्याने आढळून आलेल्या रुग्णांमध्ये सुदैवाने बेळगाव जिल्ह्यातील एकाही रुग्णाचा समावेश नाही.
राज्य शासनाने मंगळवार दि 28 एप्रिल 2020 रोजी सकाळी जाहीर केलेल्या कोरोना वैद्यकीय प्रसिद्धी पत्रकानुसार सोमवारी 27 रोजी सायंकाळी 5 वाजल्यापासून आज मंगळवार 28 एप्रिल दुपारी 12 वाजेपर्यंत राज्यात 8 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे राज्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 520 इतकी झाली असून यापैकी 198 जणांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्याचप्रमाणे आत्तापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे.
तथापि यापैकी काल मृत्युमुखी पडलेला पी-422 क्रमांकाचा कलबुर्गी येथील 57 वर्षीय रुग्ण हा कोरोनामुळे नव्हे तर यकृताच्या विकाराने निधन पावल्याचे उघडकीस आले आहे. राज्यात नव्याने आढळून आलेल्या 8 रुग्णांमध्ये कलबुर्गी येथील 6 रुग्णांचा आणि बेंगलोर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. कलबुर्गी येथील रुग्ण हे तीन महिला आणि तीन पुरुष आहेत.