कोरोनामुळे सध्या संपूर्ण जगात विचित्र परिस्थिती उदभवली आहे.बेळगाव शहरात देखील अनेक रस्त्यांची नाकेबंदी करण्यात आली असून मित्र किंवा नातेवाईक देखील काही कारणाने आपल्याकडे येऊ नयेत अशी सगळ्यांची धारणा झाली आहे.कोरोनामुळे नर्स म्हणून बिम्स मध्ये आयसोलेशन विभागात सेवा बजावणाऱ्या नर्सला देखील आपल्या तीन वर्षांच्या मुलीला भेटणे शक्य झाले नाही.
सात रुग्ण पोजीटिव्ह झाल्यामुळे प्रशासनाने आयसोलेशन विभागात सेवा बजावणाऱ्या नर्सना देखील बिम्स जवळील लॉजमध्ये राहण्याची सोय केली आहे.या कारणाने चोवीस तास हाय अलर्टवर असणाऱ्या नर्सना सदैव जागृत आणि तत्पर राहावे लागत आहे.आयसोलेशन वार्डमध्ये सेवा बजावणाऱ्या सुगंधा कोरीकोप्प या नर्सना गेल्या चार दिवसांपासून घरी जाता आले नाही.

त्यामुळे घरी असलेली त्यांची तीन वर्षांची मुलगी ऐश्वर्या आईची आठवण काढून रडत होती.इतकेच नाही तर खाणेपिणे देखील तिने सोडले होते.त्यामुळे ऐश्वर्याचे वडील संतोष यांनी पत्नी वास्तव्य करून असलेल्या लॉजकडे घेऊन आले.नंतर आई लॉजच्या बाहेर आली.आई बाहेर आलेली पाहिल्यावर ऐश्वर्या आई ये,आई ये.मला तुझ्याकडे घे म्हणून रडू लागली .चार दिवसांनी आईला पाहिल्यावर ऐश्वर्याला रडू कोसळले.
ऐश्वर्याच्या डोळ्यात अश्रू पाहिल्यावर आईच्या डोळ्यातून देखील अश्रू वाहायला केव्हा सुरू झाले हे तिलाही कळले नाही.शेवटी आईला दुरूनच बघून ऐश्वर्या वडिलांच्या बरोबर निघून गेली.हे हृदयस्पर्शी दृश्य पाहताना तेथे उपस्थित साऱ्यांचे डोळे पाणावले.
पहा तो हार्ट टचिंग व्हीडिओ