Tuesday, April 30, 2024

/

….आणि आजारी मुलासाठी रेल्वे आली धावून

 belgaum

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्यासह महिला पत्रकार मनीषा सुभेदार यांच्या प्रयत्नामुळे बेळगावच्या 5 वर्षीय गंभीर आजारी मुलाला नैऋत्य रेल्वेकडून पुण्याहून बेळगावात वेळेवर औषध उपलब्ध करून देण्यात आल्याची घटना नुकतीच घडली.

याबाबतची माहिती अशी, की टिळकवाडी बेळगाव येथील एका 5 वर्षीय मुलाला असाध्य व्याधीने ग्रासले असून त्याच्यावर पुणे महाराष्ट्र येथील एका डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत. यासाठी ठराविक अंतराने त्याच्यासाठी खास पुण्याहून औषध मागविली जाते. तथापि अलीकडे देशव्यापी लॉक डाऊनमुळे बस, रेल्वे, विमान आदी सर्व प्रवासी वाहतूक बंद झाल्यामुळे संबंधित मुलाच्या औषधाचा प्रश्‍न निर्माण झाला होता. या संदर्भात त्या मुलाच्या पालकांनी शहरातील स्नेही महिला पत्रकार मनीषा सुभेदार यांच्या कानावर ही बाब घातली. त्यावेळी मनीषा सुभेदार यांनी तात्काळ केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांच्या बेळगावातील कार्यालयासह नैऋत्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबतची माहिती दिली.

तेंव्हा रेल्वेमंत्री सुरेश अंगडी आणि वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून गेल्‍या 11 एप्रिल रोजी बेळगाव रेल्वेस्थानकाच्या अधिकाऱ्यांनी त्वरित पुणे येथील रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधून पुण्यातील संबंधित डॉक्टरांकडील औषध रेल्वे मालगाडीद्वारे बेळगावात आणले.

 belgaum

फक्त इतके करून न थांबता बेळगाव रेल्वेस्थानकाच्या अधिकाऱ्यांनी लॉक डाऊनमुळे संबंधित मुलाच्या पालकांना अडचण येऊ नये म्हणून त्यांना टिळकवाडीमध्ये घरपोच औषध देण्याची व्यवस्था केली. याबद्दल त्या मुलाच्या पालकांनी रेल्वे खात्याला धन्यवाद दिले आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.