देशातील सध्याच्या झपाट्याने होणाऱ्या कोरोना विषाणु प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोरोना बाधित रुग्णांवरील उपचारासाठी रेल्वे खात्याकडून सुमारे 60 हजार खाटांचे आयसोलेटेड कोचेस अर्थात विलगीकृत रेल्वे डब्यांची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी दिली.
बेळगाव रेल्वे स्थानकावरील हमाल स्वच्छता कर्मचारी आणि गरिबांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्याचा कार्यक्रम मंगळवारी आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी बोलत होते. रेल्वे खात्याकडून जवळपास 2,500 रेल्वे डब्यांचे आयसोलेटेड वॉर्डमध्ये परिवर्तन केले जाणार आहे. यापैकी प्रत्येक डब्यामध्ये व्हेंटिलेटर्ससह 16 खाटांची सोय असणार आहे. कोरोना बाधित रुग्णांवरील उपचारासाठी असणारे हे रेल्वेचे डबे कोठेही हलविता येणार असल्यामुळे त्यांना “मोबाइल कोचेस” असे म्हणता येईल, असेही मंत्री अंगडी यांनी सांगितले.
लॉक डाऊनच्या काळात येथून पुढे देखील धान्य आणि पेट्रोलियम उत्पादनांचा तुटवडा भासणार नाही सरकारकडे या गोष्टींचा पुरेसा साठा आहे. सध्या आमच्याकडे म्हणजे सरकारकडे सहा लाख क्विंटल धान्य आहे हे आणि 50 हजार किलो लिटर डिझेल व पेट्रोलचा साठा आहे, अशी माहितीही ही केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री सुरेश अंगडी यांनी दिली.
याप्रसंगी बेळगाव उत्तरचे आमदार अॅड. अनिल बेनके आणि विभागीय रेल्वे व्यवस्थापक अरविंद मालखेडे यांनी देखील आपले समयोचित विचार व्यक्त केले. सदर कार्यक्रमात सामाजिक अंतर ठेवून रेल्वे स्थानकावरील हमाल, स्वच्छता कर्मचारी आणि गरिबांना मंत्री सुरेश अंगडी तसेच अन्य मान्यवरांच्या हस्ते जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.