खानापूर तालुक्यातील हब्बनहट्टी येथील श्री स्वयंभू मारुती देवस्थान येथे दरवर्षी हनुमान जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. तथापि यंदा लॉक डाऊनमुळे या देवस्थान परिसरात शुकशुकाट पहावयास मिळाला.
खानापूर तालुक्यातील जांबोटीनजीक हब्बनहट्टी हे गांव श्री स्वयंभू मारुती देवस्थानासाठी पंचक्रोशीसह आसपासच्या राज्यातही प्रसिद्ध आहे. या देवस्थानाच्या ठिकाणी दरवर्षी श्री हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. हनुमान जयंती दिवशी या ठिकाणी हजारो भाविक देव दर्शनासाठी येत असल्यामुळे देवस्थान परिसर गर्दीने फुलून गेलेला असतो. तथापि सध्या या याठिकाणी शुकशुकाट पहावयास मिळत आहे.
कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशव्यापी लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्या अनुषंगाने धार्मिक स्थळे आणि मंदिरांमधील भाविकांच्या प्रवेशावर तसेच यात्रा, उत्सव आदी सामूहिक धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. बंदी आदेशाच्या अंमलबजावणीसाठी जी प्रसिद्ध देवस्थाने आहेत त्या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर बुधवारी हनुमान जयंती असून देखील हब्बनहट्टी येथील श्री स्वयंभू मारुती देवस्थान येथे शुकशुकाट पसरला होता. पोलिसांनी या ठिकाणी देखील बॅरिकेड्स टाकून भाविकांच्या प्रवेशावर बंदी घातली होती.
बुधवार सकाळी कांही कट्टर हनुमान भक्तांनी सदर देवस्थानाला भेट देऊन देव दर्शन घेण्याचा प्रयत्न केला. तथापि पोलिसांनी त्यांना मंदिरात जाण्यापासून अडविले आणि माघारी पाठविले. एकंदर लॉक डाऊनमुळे हब्बनहट्टी येथील श्री स्वयंभू मारुती देवस्थान परिसरात श्री हनुमान जयंती असून देखील बुधवारी दिवसभर सामसूम वातावरण होते.