लॉकडाऊनमुळे भटक्या कुत्र्यांना उपासमारीला तोंड द्यावे लागत आहे.खायला मिळत नसल्याने कुत्री आणि पिल्ले याना उपासमारीला तोंड द्यावे लागत आहे.अत्यंत दयनीय अवस्थेत हे मुके प्राणी रस्त्याकडेला बसलेले पाहायला मिळतात.कोणीतरी खायला काही घालतील या आशेने येणाऱ्या जाणाऱ्याकडे हे मुके जीव पाहत असतात.
अशा स्थितीत त्यांच्यासाठी शहरातील नागरिकांनीच पुढाकार घ्यायला हवा. घरापासून दूर जाणे शक्य नाही. त्यामुळे जवळच्या वस्तीत कुत्र्यांसाठी अन्न व पाण्याची सोय करावी.जायंट्स मेनचे मदन बामणे हे तिसऱ्या रेल्वे गेटजवळ कामानिमित्त गेले होते.त्यावेळी तिथे एक कुत्र्याचे छोटे पिल्लू भुकेने तळमळत असलेलं त्यांनी पाहिलं आणि त्याला बिस्कीट खायला घालण्याचा प्रयत्न केला. पण ते लहान असल्याने त्याला दुधाची गरज होती. तेवढ्यात तिथे त्या पिल्लाची आई आली, भुकेने व्याकुळ झालेली ती आई बिस्कीट खाऊ लागली आणि ते पिल्लू दूध पिण्यासाठी धडपडत होतं पण…
पोटात काय नसल्याने उपासमारीमुळे त्या आईच्या स्तनातुन दूधच येत नव्हते.त्यामुळे दूध पिण्याचा प्रयत्न करणाऱ्या पिल्लाला आई लाथ मारत होती.ही परिस्थिती बघून बामणे यांनी समोरच असलेल्या कल्पवृक्ष फौंडेशनच्या सविता कांबळे यांना दूध आणि पाण्याची व्यवस्था करण्याची विनंती केली.
त्यांनी दूध दिल्यानंतर कुत्र्याचे पिल्लू आणि आई समाधानी झाले.यावेळी बेलगाम ऍनिमल वेल्फेअर असोसिएशनची कार्यकर्ती तिथे आली आणि तिने सुध्दा त्यांना दूध ,बिस्किटे भरवण्यास मदत केली.आज लॉकडाऊनमुळे छोट्या पिल्लांच्या आईची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कारण पिल्लांना दुधाची गरज असते अशी प्रतिक्रिया मदन बामणे यानी व्यक्त केले.