Tuesday, April 30, 2024

/

आबाची गाडी, बाबाची बैलं सख्या हाकणार,तुक्या बोंबलणार..

 belgaum

लॉक डाऊनमुळे सीमा भागात संकलित होणारे दूध, जे महाराष्ट्रातील दूध संघांना जात होते ते बंद झाले आहे.गोव्यातही नंदिनी दुधाचा होणारा पुरवठा संकुचित झाला आहे.अशावेळी शेतकऱ्यांकडून येणाऱ्या दुधाचा अतिरिक्त भार के एम एफ (कर्नाटक मिल्क फेडरेशन)वर पडत आहे. या अतिरिक्त दुधाचे काय करायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. के एम एफ शेतकऱ्यांचे दूध नाकारून त्यांनाही अडचणीत आणू शकत नाही.अश्या वेळी शासनाने हे अतिरिक्त दूध गरजूंना मोफत वाटण्याचा निर्णय घेतला. हे दूध सर्वसाधारण गरीब वर्गात पोहोचावे असा शासनाचा होरा होता. परंतु मोफत दुधाच्या वितरणाच्या पद्धतीत अजिबात सुसूत्रपणा नव्हता.

दूध भरून येणाऱ्या गाडीच्या पाठीमागे लोकं धावत जात होती. मोठ्या प्रमाणात गोंधळाची परिस्थिती निर्माण होत होती. अश्यावेळी काही संधीसांधूना यात संधी दिसु लागली विशिष्ट नेत्यांचे नाव घेत त्यांच्या मार्फत हे दूध आलेलं आहे असे भासवायला त्यांनीसुरू केले. आणि हतबल झालेल्या के एम एफ च्या वितरण व्यवस्थेवर आपला कब्जा मिळवला. साहेबांचे कार्यकर्ते कामाला लागले, आपल्या मर्जीतील लोकांच्या घरात दोनदोन चारचार लिटर दुध पोचवू लागले, काहीनी तर आपले घर म्हणजे मोफत दूध मिळण्याचे ठिकाण असे भासवायला चालू केले. गरीब बाया बापड्या दूध मागायला आल्या तर त्यांच्या अंगावर खेकसु लागले. अश्या परिस्थितीत जे खरे गरजवंत होते त्यांना दूध मिळालंच नाही.

जुने हेवेदावे, पक्षीय राजकारण उफाळून येऊ लागले. कुणाचा तरी माल, कोणितरी वाटणार आणि कोणीतरी मालकी दाखवणार असा प्रकार चालू झाला.सध्या के एम एफ कुणाच्या इशाऱ्यावर नाचते हेच कळेनासे झाले आहे.गाड्या भर भरून दूध येत आहे लाभार्थी दुध घेत आहेत आणि गरीब बिचारे मोकळ्या भांड्याने घरात बसले आहेत.

 belgaum

हुबळी येथे मोफत दूध वाटपाला ब्रेक लावण्यात आलाय. जर खऱ्या गरजवंताला दूध मिळणारच नसेल, तर मोफत दूध वाटण्याचा उपयोगच काय? मूळ उद्देशाला तडा जात असताना धन दांडग्याच्या गळ्यात फुकटच दूध देण्यापेक्षा काही गल्ल्यानी आमच्या गल्लीत दूध आणू नका असा स्पष्ट इशारा दिला आहे.के एम एफ ने स्वतःची वितरण व्यवस्था नसेल तर अश्या प्रकारे मोफत दूध वाटपाचा पुनर्विचार करावा. जर मोफत दूध वाटपात जागतिक संकटाचा विचार न करता पक्षीय राजकारण बोकाळणार असेल तर, हा मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे. आणि हे बंद होणे गरजेचे आहे.

माननीय पंतप्रधान अख्या देशाला एकत्र येऊन या संकटाशी लढण्याचे आवाहन करत असताना, काही लोक याच्या पाठीमागून आपल्या पक्षाचा प्रचार करत असतील तर हा देखील भ्रष्टाचारच आहे. त्याच बरोबर राष्ट्रद्रोह सुद्धा आहे, याची देखील दखल घेण गरजेचं आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.