बेळगाव येथे कोरोना तपासणी प्रयोगशाळा उभारण्यास आयसीएमआर कडून एक-दोन दिवसात मान्यता मिळण्याची शक्यता असल्याची माहिती बेळगाव जिल्ह्याचे पालक मंत्री जगदीश शेट्टर यांनी बुधवारी हुबळी येथे दिली.
हुबळी येथील कर्नाटक इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अर्थात किम्स हॉस्पिटलमधील कोरोना तपासणी प्रयोगशाळा बुधवारपासून कार्यान्वित झाली, याप्रसंगी पालकमंत्री जगदीश शेट्टर बोलत होते. बेळगाव जिल्ह्याची स्वतःची कोरोना तपासणी प्रयोगशाळा असावी अशी अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. आता अल्पावधीत ही मागणी पूर्ण होणार असून बेळगाव येथे करोना विषाणू तपासणी प्रयोगशाळा स्थापण्यात येणार आहे. बेळगाव येथील आयसीएमआरच्या आवारामध्ये सदर प्रयोगशाळा सुरू करण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. शशिकांत मुन्याळ यांनी सांगितले.
हुबळी येथील कर्नाटक इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (किम्स) येथील प्रयोगशाळेत कोरोना संशयितांच्या घशातील द्रवाचे अर्थात स्वॅबचे तपासणी कार्य आज बुधवारपासून सुरू झाले आहे. आता हुबळी येथील सदर प्रयोगशाळेत धारवाड, हावेरी, गदग आणि कारवार जिल्ह्यासह बेळगाव जिल्ह्यातील कोरोना संशयित रुग्णांच्या स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी केली जाणार आहे.