बेळगाव तालुक्यातील सर्वात मोठा ईंगळयांचा कार्यक्रम व मोठी यात्रा मानली जाणारी मुचंडी येथील श्री सिद्धेश्वर यात्रा कोरोना विषाणू प्रादुर्भावामुळे यंदा रद्द करण्यात आली आहे. तेंव्हा गावकऱ्यांनी उद्या गुरुवारपासून सुरु होणाऱ्या या यात्रेसाठी देवस्थानाकडे जमू नये अन्यथा त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा देवस्थान पंच कमिटीने दिला आहे.
सालाबादप्रमाणे मुचंडी (ता. बेळगाव) येथे गुरुवार 9 ते सोमवार 13 एप्रिल 2020 या कालावधीत श्री सिद्धेश्वर यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. ही यात्रा बेळगाव तालुक्यातील सर्वात मोठी यात्रा म्हणून ओळखली जाते. त्याचप्रमाणे या ठिकाणचा इंगळ्याचा कार्यक्रम देखील आपल्या भव्यतेसाठी संपूर्ण जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. हजारो भाविकांचा सहभाग असणारा हा इंगळेचा कार्यक्रम येत्या शुक्रवारी 10 एप्रिलला होणार होता. यात्रेच्या पहिल्या दिवशी गाडे, दुसऱ्यादिवशी इंगळ्या आणि पुढील तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांसह कुस्ती मैदान आयोजित केले जाणार होते.
मात्र आता कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशव्यापी लॉक डाऊन जाहीर करण्यात आल्यामुळे सदर यात्रोत्सव रद्द करण्यात आला आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने धार्मिक स्थळ आणि मंदिरातील भाविकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे. या अनुषंगाने मुचंडी येथील श्री सिद्धेश्वर देवस्थानाच्या ठिकाणीदेखील पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
तेंव्हा श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त गावातील नागरिकांनी देवस्थानाकडे देवदर्शनासाठी जाऊ नये. तसेच जो कोणी या आदेशाचे उल्लंघन करीन त्याला दंड ठोठावून त्याच्यावर पोलिस कारवाई केली जाईल, असा इशारा देवस्थान पंच कमिटीने दिला आहे. त्याचप्रमाणे मुचंडी गावामध्ये आज बुधवारी तशा आशयाची दवंडीही देण्यात आली आहे.