कोरोना हा विषाणू किती प्राणघातक आहे हे सध्या जगभरात या विषाणूमुळे मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या संख्येवरून लक्षात येते. जगातील बहुतांश देशात नागरिकांनी शासनाच्या कोरोना संदर्भातील सूचनांकडे दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना मृत्यूला सामोरे जावे लागले आहे. ही वस्तुस्थिती असताना बेळगावात देखील कोरोनासंदर्भात शासनाने काटेकोर अंमलबजावणीसाठी केलेल्या सूचनांना नागरिकांकडून वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत. याची दखल टिळकवाडी पहिल्या रेल्वे गेट येथील नेहरू रोडनजीक राहणाऱ्या श्रीमती मेघना हेगडे यांनी घेतली आहे.
बेळगावात लॉक डाउन असताना देखील अनेक लोक घरा बाहेर पडताहेत कोरोना प्रादुर्भावासंदर्भात जनजागृतीसाठी मेघना हेगडे यांनी आपल्या कंपाउंड गेटवर “प्लीज स्टे अॅट होम” हा फलक उभारला आहे. सध्याच्या परिस्थितीत कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नागरिकांनी शक्यतो घरामध्येच राहणे हितावह ठरणार असल्याचे त्यांना सुचवायचे आहे.
राज्य शासनाने कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध सूचना जारी करून त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले आहे. त्यामध्ये विनाकारण घराबाहेर न पडता शक्यतो घरातच राहणे, गर्दी न करणे, शक्यतो मास्क वापरणे या सूचनांचाही समावेश आहे. तथापि सध्या शहरासह जिल्ह्यात 144 कलमान्वये जमावबंदी लागू असतानादेखील नागरिक बेफिकीरपणे वागताना दिसत आहेत. याच बेफिकिरीची इटलीतील नागरिकांना मोठी किंमत मोजावी लागत आहे.
इटलीमध्ये काल रविवारी एकाच दिवशी 793 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून शासनांच्या सूचनांकडे दुर्लक्ष केल्याचा हा परिणाम आहे. या पार्श्वभूमीवर टिळकवाडीतील मेघना हेगडे यांनी आपल्या कंपाउंड गेटवर उभारलेला “प्लीज स्टे अॅट होम” अर्थात “कृपया घरीच रहा” असे लिहिलेला फलक त्यांच्या घरासमोरून ये-जा करणाऱ्यांना परिस्थितीचे गांभीर्य विशद करत आहे, असे म्हंटल्यास वावगे ठरू नये. सर्वसामान्य गृहिणी असणाऱ्या मेघना हेगडे यांनी घर बसल्या सुरू केलेल्या कोरोना विषाणू संदर्भातील या जनजागृतीचा आदर्श इतरांनी घेणे ही काळाची गरज आहे. बेळगावातील जनतेने देखील लॉक डाउन गंभीरपणे पाळण्याची गरज आहे.