कर्नाटक आणि केरळ राज्यातून उत्तर गोव्यामध्ये होणाऱ्या कोंबड्यांच्या थेट आणि अप्रत्यक्ष वाहतुकीवर (प्रवेशावर) शनिवार दिनांक 21 मार्च 2020 रोजी मध्यरात्रीपासून बंदी घालण्यात आली असल्याचे उत्तर गोव्याचे जिल्हा दंडाधिकारी आर. मेनका यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केले आहे.
कर्नाटकातील म्हैसूर व दावणगिरी तसेच केरळमधील कॉड्रायाथूर व कोझिकोडी येथून उत्तर गोव्यामध्ये कोंबड्या पुरवल्या जातात. तथापि आता या ठिकाणच्या कोंबड्यांना एव्हीयन इन्फ्ल्यूंझा (एच5एन) अर्थात बर्ड फ्लू झाल्याचे गोवा सरकारच्या पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय खात्याच्या संचालकांच्या निदर्शनास आले आहे.
हा प्रकार उत्तर गोव्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक आहे. यासाठी गोवा पशुसंवर्धन व पशुवैद्यकीय खात्याच्या संचालकांशी झालेल्या चर्चेअंती शनिवारी 21 रोजी मध्यरात्रीपासून कर्नाटक व केरळ राज्यातून उत्तर गोव्यामध्ये होणाऱ्या कोंबड्यांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली असून पुढील आदेशापर्यंत ती लागू राहणार आहे, असे उत्तर गोव्याचे जिल्हा दंडाधिकारी आर. मेनका यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.
दरम्यान, सध्या देशभरात कोरोना विषाणूची दहशत निर्माण झाली आहे. गोवा राज्य देखील त्याला अपवाद नाही. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी गोवा सरकारकडून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात असतानाच आता कोंबड्यांना होणाऱ्या बर्ड फ्लूचे संकट उभे ठाकले आहे. यामुळे उत्तर गोव्यातील मांसाहारी व चिकनप्रेमी नागरिकांत भितीचे वातावरण पसरले आहे.