माणसाला माणूस म्हणून टिकवायचे आणि माणूस म्हणून जगायला लावायचे कार्य मातृभाषाच करते.मातृभाषेपासून समाज दूर जाता कामा नये.माणसं जितकी शिकत जातात तितकी जातीयवादी होतात काय अशी भीती वाटते.साहित्यिक जर एखादया धर्माचे प्रतिनिधित्व करत असतील तर ते नवा भारत कसा घडवणार असा सवाल ज्येष्ठ लेखक,कवी,चित्रपट निर्माते,दिग्दर्शक रामदास फुटाणे यांनी केला.
इंदिरा संत संमेलन नगरी येथे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे पहिले राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलन मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडले.संमेलनाचे अध्यक्षस्थान रामदास फुटाणे यांनी भूषवले होते.तंजावरचे राजे व्यंकोजीराजे भोसले यांचे तेरावे वंशज संभाजीराजे भोसले यांची विशेष उपस्थिती होती. व्यासपीठावर
परिषदेचे अध्यक्ष शरद गोरे,वकील सुधीर चव्हाण,रवींद्र पाटील,माजी आमदार मनोहर किणेकर, दीपक दळवी ,आप्पासाहेब गुरव,प्राचार्य आनंद मेणसे आणि मान्यवर उपस्थित होते.
काय स्वीकारावे आणि काय नाकारावे याची क्षमता वाढणे गरजेचे आहे.ही क्षमता साहित्य वाढवते.वाहिन्यांवरील सिरियलमुळे कुटुंब व्यवस्था उध्वस्त होत आहे.मराठी माणूस एकसंघ उभा राहिला पाहिजे.प्रांतवाद,जातीयवाद करायचा नाही पण मराठी बाणा डावलायचा नाही असेही रामदास फुटाणे म्हणाले.
शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.गोवावेस येथून ग्रंथदिंडी काढण्यात आली.ग्रंथदिंडीत झान्ज पथक,वारकरी आणि शिवाजी महाराजांची वेशभूषा केलेले बालचमू सहभागी झाले होते.चार सत्रात संमेलन पार पडले.प्रारंभी साहित्य क्षेत्रात योगदान दिलेल्या साहित्यिकांचा रामदास फुटाणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.संमेलनाला मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली होती.