बेळगावातून संशयित कोरोना रुग्णाचे घशाचे द्राव बंगलोरला आरोग्य खात्याने पाठवले होते.त्यापैकी दोन जणांचा रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे रिपोर्ट सकाळी आले होते.उर्वरित तीन संशयितांचे रिपोर्ट देखील आज आले असून ते निगेटिव्ह आहेत.
त्यामुळे बेळगावहून पाठवलेल्या प्रयोगशाळेतील नमुने निगेटिव्ह आल्यामुळे बेळगाव जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण नाही असे जिल्हाधिकारी डॉ एस बी बोमनहळ्ळी यांनी कळविले आहे.केवळ एकच रुग्णाचा रिपोर्ट येणे बाकी आहे त्यामुळे सध्या तरी बेळगावमध्ये कोरोनाचा धोका टळला आहे.
बेळगावची जनता लॉक डाऊनचं गांभीर्य का समजून घेत नाही?
राज्यातील नऊ जिल्ह्यात लॉक डाऊनची घोषणा करण्यात आली आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन घोषित केला, मात्र बेळगाव आणि परिसरातील लोकांनी नियम धाब्यावर बसवून घराबाहेर पडून गर्दी केली. सोमवारी रविवार पेठे,कलमठ रोड येथे माल वाहतूक करणाऱ्या आणि नागरिकांच्या वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या.
वाहतूक पोलीस नसल्यामुळे ही गर्दी वाढतच होती.बेशिस्त कशी असते याचे उत्तम उदाहरण हे होते.गर्दी करू नका म्हणून सांगितले जाते पण लोक नियम पाळत नाहीत.कोरोनाच्या संकटाशी लढा द्यायचा असेल तर लॉकडाउन गांभीर्यानं घ्या. घरी थांबा, स्वतःचा आणि कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालू नका .घरात प्रत्येकजण राहिला तर कोरोनाचा प्रादुर्भाव होणार नाही. यासाठी घरातच बसा, बाहेर पडणे शक्यतो टाळा असे आवाहन करण्यात आले आहे.