लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर शहरात ठिकठिकाणी बंदोबस्तास असणाऱ्या पोलिसांना अल्पोपहार वाटप करण्याचा उपक्रम बेळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राबविण्यात येत आहे.
करोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या देशव्यापी लॉक डाऊन यशस्वी करण्यासाठी पोलिस खाते झटत आहे. यासंदर्भात शहरात ठिकठिकाणी बंदोबस्त असणाऱ्या पोलिसांना बेळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सकाळ, दुपार आणि संध्याकाळ असा दिवसातून तीन वेळा केळी व पिण्याचे पाणी असा अल्पोपहार वितरीत केला जात आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे बेळगाव जिल्हा अध्यक्ष राजू पाटील यांच्या नेतृत्वाखाली श्याम मंतेरो, अमोल देसाई व दुर्गेश मेत्री असे चौघेजण दुचाकीवरून पोलिसांना अल्पोपहार देण्याचे कार्य गेल्या दोन दिवसापासून करत आहेत. याबद्दल ठिकाणी बंदोबस्तास असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून या कार्यकर्त्यांना धन्यवाद दिले जात आहेत.
दरम्यान लॉक डाऊनचा कालावधी संपेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अशा पद्धतीने पोलिसांना अल्पोपहाराचे नियमित वाटप केले जाणार आहे. त्याचप्रमाणे परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन लवकरच गरीब गरजू लोकांनाही अन्नधान्य आदी जीवनावश्यक वस्तूंचे मोफत वितरण केले जाणार आहे.