“स्वप्नात होते माझ्या” आणि “हे गजानना” या अल्बम सॉंगमधून नावारूपाला आलेला बेळगावचा इनफिनिटी ग्रुप आता चित्रपट निर्मिती क्षेत्रात उतरण्याचे धाडस करत असून “गल्लीमेट्स” हे त्यांच्या पहिला चित्रपटाचे शीर्षक असणार आहे. बेळगावच्या स्थानिक कलाकारांना या चित्रपटात काम करण्याची संधी मिळणार आहे.
इन्फिनिटी ग्रुपचे सदस्य “गल्लीमेट्स” द्वारे चित्रपटाच्या दृष्टिकोनातून चित्रपट दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत. बेळगावच्या अनुप पवार यांने “गल्लीमेट्स” या चित्रपटाची कथा व पटकथा लिहिली आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण बेळगाव परिसरात करण्यात येणार असून बेळगावसह सांगली व कोल्हापूर येथील कलाकार यामध्ये असतील. विशेष म्हणजे बेळगावच्या बोलीभाषेचा वापर या चित्रपटांमध्ये करण्यात आला असल्यामुळे बेळगावशी संबंधित लोकांना हा चित्रपट पाहताना एक वेगळाच आनंद मिळणार आहे. सीमाभागातील युवकांमध्ये गुणवत्ता असली तरी त्यांना व्यासपीठ उपलब्ध होत नाही हे लक्षात घेऊन इन्फिनिटी ग्रुपतर्फे ही गुणवत्ता शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
इन्फिनिटी ग्रुपमध्ये अनुप पवार, संतोष कडोलकर, मनोज तानवडे, विनय पाटील, निहाल देसाई, अमर घाडगे, शुभम करजगार, उमेश तेपुगडे, योगेश कदम आदी युवकांचा समावेश आहे. या पूर्णपणे बेळगावच्या युवकांनी तयार केलेल्या “गल्लीमेट्स” चित्रपटात तितक्यात तोडीची गाणी आहेत. सदर चित्रपटातील कलाकार निवडीसाठी येत्या शुक्रवारी 13 मार्च रोजी कोल्हापूर येथे त्यानंतर 14 मार्चला सांगली येथे आणि रविवार 15 मार्च रोजी बेळगावमध्ये ऑडिशन घेतली जाणार आहे.
इन्फिनिटी ग्रुपमधील युवक हे सर्वसामान्य कुटुंबातील असून सातत्याने नवनवे उपक्रम करण्यावर त्यांचा भर असतो. चित्रपट तयार करणे त्यासाठी पैसा उभा करणे ही सोपी गोष्ट नाही. तथापि इन्फिनिटी ग्रुपच्या सदस्यांनी स्वतः जवळील जमापुंजी या चित्रपटाच्या निर्मितीसाठी एकत्रित केली आहे. बेळगावातील कांही चित्रपटप्रेमी आणि दानशूर व्यक्ती या युवकांना मदत करण्यासाठी पुढे सरसावल्या असल्या तरी चित्रपट निर्मितीसाठी मोठा खर्च येत असल्याने अद्यापही त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. दरम्यान चित्रपट निर्मितीसाठी धडपडणाऱ्या या स्थानिक इन्फिनिटी ग्रुपला बेळगावकर निश्चितपणे सढळहस्ते मदत करतील, असा विश्वास त्यांच्या हितचिंतकांमधून व्यक्त केला जात आहे.