बेळगाव शहरात सध्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत मोठ्याप्रमाणात कामांना चालना देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत सर्वत्रच अर्धवट पडणारे रस्ते धुळीने मागणारे नागरिक आणि बाहेरुन येणाऱ्या पाहुण्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे परगावाहून येणाऱ्या पाहुण्यांना आता बरेच नागरिक म्हणत आहेत, पावणे हो बेळगावात येताय श्वास रोखून मग आत प्रवेश करा असे म्हणण्याची वेळ या कामांमुळे आली आहे. मात्र याचा गांभीर्याने विचार प्रशासन करत नसल्याचे दिसून येत आहे.
बेळगाव शहराचा कायापालट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात स्मार्ट सिटी योजनेतून रस्ते उघडून ठेवण्यात आले आहेत. या कामांमुळे रस्त्यावर धुळीचे लोळ उठत आहेत. एखादा व्यक्ती पांढरा शर्ट घालून आला तर तो घरी जाईपर्यंत तांबडा होतो अशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे रस्ते उखडून ठेवण्यापेक्षा ते तातडीने करण्याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
सुंदर आणि स्वच्छ बेळगाव अशी व्याख्या असणाऱ्या शहराला आता गालबोट लागत असल्याचे दिसून येत आहे. बेळगावात प्रवेश करताना धुळीमुळे नकोसे वाटू लागले आहे. काही जण तर आपल्या पाहुण्यांना विचारूनच बेळगावात दाखल होत असल्याचे प्रकारही घडू लागले आहेत. या साऱ्या प्रकाराला केवळ आणि केवळ प्रशासन जबाबदार आहे. मात्र याचे सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या नावाने शिमगा करण्याची वेळ निर्माण झाले आहे.
बेळगाव हे दुसरे महाबळेश्वर म्हणून ओळखले जाते. मात्र या व्याख्येला सुरुंग लावण्याचे काम प्रशासनाने केले आहे. बेळगावात अनेक ठिकाणचे रस्ते उघडून ठेवण्यात आल्याने धुळीमुळे अनेकांना श्वासाचा त्रास होत आहे. अनेकांना याची एलर्जी असल्याने घरी बसणे पसंत करत आहेत. हे सारे प्रकार घडत असले तरी प्रशासनाने कातडी ओढून झोपण्याचे सोंग घेतले आहे. त्यामुळे यापुढे तरी रस्त्यांची कामे तातडीने करून नागरिकांनी निश्वासाचा श्वास घेण्यास द्यावा अशी मागणी होत आहे.