भारतीय हवाई दलातर्फे सांबरा (ता. बेळगाव) येथील एअरमन ट्रेनिंग स्कूल येथे आयोजित इंटर कमांड अल्ट्रा सायकलिंग कॉम्पिटिशन 2020 – 21 ही सायकलिंग शर्यत आज गुरुवारी यशस्वीरित्या उत्साहात पार पडली. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सायकलिस्ट विंग कमांडर रोहन आनंद हे या शर्यतीचे मुख्य आकर्षण होते.
सदर शर्यतीचे उद्घाटन प्रमुख पाहुणे एअरमन ट्रेनिंग स्कूल बेळगावचे ऑफिसर कमांडिंग एअर कमोडोर आर. रविशंकर यांनी ध्वज दाखवून केले. या 200 कि. मी. अंतराच्या अल्ट्रा सायकलिंग शर्यतीत हवाईदलाच्या 7 कमांडमधील एकूण 35 मातब्बर सायकलिस्टनी भाग घेतला होता. एका दिवसात 200 कि. मी. अंतर कापण्याच्या या शर्यतीसाठी आंतरराष्ट्रीय नियम लागू करण्यात आले होते. शर्यत यशस्वी करण्यासाठी नॅशनल हायवे अॅथोरिटी ऑफ इंडिया (एनएचएआय) धारवाड आणि बेळगाव शहर पोलीस आयुक्तांचे सहकार्य लाभले.
वैयक्तिक व सांघिक अशा दोन गटांमध्ये घेण्यात आलेल्या या शारीरिक व मानसिक क्षमतेचा कस लावणाऱ्या शर्यतीमध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सायकलिस्ट विंग कमांडर रोहन आनंद यांनी आवर्जून सहभाग दर्शविला होता. शर्यतीचा बक्षीस वितरण समारंभ प्रमुख पाहुणे एअर कमोडोर आर. रविशंकर व इतर मान्यवरांच्या हस्ते पार पडला. यशस्वी सायकलपटूंना आकर्षक करंडक, मेडल्स आणि प्रशस्तीपत्रके देण्यात आली.