बेळगाव रेल्वे स्थानकासमोरील एका दुकानाशेजारी आडोशाला एका बॉक्समध्ये 2 महिन्यांची बेवारस बालिका गुरुवारी सकाळी आढळून आल्यामुळे हा एक चर्चेचा विषय बनला होता.
याबाबतची अधिक माहिती अशी की, आज गुरुवारी सकाळी बेळगाव रेल्वे स्थानकासमोरील एका दुकानाशेजारून बाळाचा रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. परिणामी आसपासच्या नागरिकांनी कुतूहलापोटी शोधाशोध केली असता त्यांना एका बॉक्समध्ये अवघ्या 2 महिन्याची अंगात फ्रॉक असलेली बेवारस बालिका आढळून आली. तेंव्हा याबाबत लागलीच पोलीस स्थानकात माहिती देण्यात आली.
पोलिसांनी देखील त्वरित घटनास्थळी दाखल होऊन त्या बालिकेला ताब्यात घेतले. तसेच तिच्याबाबत रेल्वे स्थानक परिसरात चौकशी करून बालिकेच्या माता-पित्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. तथापि कोणीही त्या बालिकेवर हक्क सांगण्यासाठी पुढे आले नाही.
सदर घटनेची नोंद करून घेऊन ताब्यात घेतलेल्या त्या बालिकेची पोलिसांनी बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करून घेतली. त्यानंतर संरक्षण व पालनपोषणासाठी त्या मुलीला स्वामी विवेकानंद सेवा प्रतिष्ठान (बाल कल्याण) समितीकडे सुपूर्द केले. दरम्यान, बेवारस मुलगी सापडल्याची ही घटना गुरुवारी सकाळी रेल्वे स्थानक परिसरात चर्चेचा विषय बनली होती.