शहरात सुरू असलेल्या स्मार्ट सिटी रस्त्याच्या कामामुळे वाहतूक पोलिसांवर मोठा ताण पडत आहे.अनेक ठिकाणी शहरात रस्त्याची कामे सुरू आहेत. त्यामुळे रस्त्याच्या एका बाजूनेच फक्त वाहतूक सुरू आहे.एका बाजूने वाहतूक सुरू आहे आणि मुख्य रस्त्यावरून बाजूच्या रस्त्यांना जोडणारे मार्ग देखील बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आले आहेत.तरीही काही जण काम सुरू असलेल्या रस्त्यावरून वाहन घेऊन जाताना पाहायला मिळतात.
एखादे वाहन जरी रस्त्यावर आडवे जात असले तरी लगेच दोन्ही बाजूनी वाहनांच्या रांगा लागतात.गोगटे सर्कल,बोगरवेस,शहापूर बँक ऑफ इंडिया कॉर्नर,कित्तूर चन्नमा जवळील कॉलेज रोड,महात्मा फुले रोड येथे रस्त्याचे काम सुरू असल्याने जेथे सिग्नल आहेत तेथे पोलिसांनाच वाहतूक नियंत्रणाचे काम करावे लागत आहे.
गोगटे सर्कलमध्ये चार वाहतूक पोलिसांना रहदारी नियंत्रित करण्यासाठी कष्ट घ्यावे लागत आहेत.बोगार वेस येथे देखील वाहतूक पोलिसांना वाहतूक सुरळीत करण्यासाठी सतत कार्यरत राहावे लागत आहे.बँक ऑफ इंडियाकडे देखील वाहतूक पोलीस धूळ, उन्हाला तोंड देत वाहतूक नियंत्रित करत आहेत.वाहतूक पोलीस आहेत म्हणून थोड्या प्रमाणात तरी वाहतूक सुरळीत चालते.
पोलीस थोडा वेळ जरी बाजूला गेले तर वाहतुकीची कोंडी होते.त्यामुळे नागरिक आणि वाहतूक पोलीस यांना होत असलेल्या त्रासाची तरी दखल घेऊन स्मार्ट सिटी अधिकाऱ्यांनी रस्त्याची कामे लवकर संपवण्याची गरज आहे.