प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे.ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात मतदानाचे प्रमाण कमी आहे.आपण देशाचे नागरिक आहोत म्हणून अभिमानाने सांगण्यासाठी निवडणुकीत मतदान केले पाहिजे असे प्रतिपादन जिल्हा सत्र न्यायाधीश सतीश सिंग यांनी केले.
कुमार गंधर्व रंगमंदिरात आयोजित दहाव्या राष्ट्रीय मतदान कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी एस बी बोमनहळ्ळी होते. प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस आयुक्त लोकेशकुमार उपस्थित होते.जि प सीईओ डॉ के व्ही राजेंद्र यांचीही व्यासपीठावर उपस्थिती होती.
मतदानाच्या दिवशी सुट्टी दिली जाते पण मतदान करण्यासाठी नागरिक येत नाहीत.जगातील लोकशाहीमध्ये भारताची लोकशाही मोठी आहे.लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकाने मतदान केले पाहिजे असे न्या सतीश सिंग म्हणाले.
यावेळी मतदार यादीत नव्याने नाव समाविष्ट झालेल्या तरुण मतदारांना मतदान ओळखपत्र वितरित करण्यात आले.मतदान दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धातील विजेत्यांना या कार्यक्रमात बक्षिसे देण्यात आली.मतदान दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय ते कुमार गंधर्व रंगमंदिर पर्यंत जनजागृतीसाठी रॅली काढण्यात आली.