अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत बेळगावातील मराठी पत्रकारांनी आपले कार्य सुरू ठेवले आहे.आज वृत्तपत्र क्षेत्रात आमूलाग्र बदल घडले आहेत. वेब पोर्टलचा सामना वृत्तपत्रांना करावा लागत आहे.पण वृत्तपत्रांची विश्वासार्हता मात्र कायम टिकून आहे.त्यामुळेच आजही लिखित माध्यमाला महत्व आहे असे उदगार कोल्हापूर जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी काढले.
बेळगाव जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे पत्रकार भवनात पत्रकार दिनाचे आयोजन करण्यात आले होते.या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रशांत सातपुते उपस्थित होते.व्यासपीठावर पत्रकार संघाचे अध्यक्ष कृष्णा शहापूरकर, सचिव शेखर पाटील,ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक विठ्ठलराव याळगी उपस्थित होते.
प्रारंभी दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे प्रशांत सातपुते यांच्या हस्ते पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.
सोशल मीडियावर अनेक खोट्या बातम्या फिरत असतात त्यामुळे पत्रकारांनी खातरजमा केल्याशिवाय कोणतीही पोस्ट फॉरवर्ड करू नये असे आवाहन देखील त्यांनी केलं
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक विठ्ठलराव याळगी याना श्री सरस्वती वाचनालयाचा बेळगाव भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल सातपुते यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला.राष्ट्रीय वक्तृत्व स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल प्रणव अध्यापक याचाही सत्कार करण्यात आला.प्रणव याच्या वतीने विलास अध्यापक यांनी सत्कार स्वीकारला.
यावेळी विठ्ठलराव याळगी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.रणझुंझारचे संपादक मनोहर कालकुंद्रीकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.सुहास हुद्दार यांनी आभार मानले.