भारत सरकारच्या ‘फिट इंडिया’ अर्थात तंदुरुस्त भारत उपक्रमाला अनुसरून शहरातील गुड शेफर्ड सेंट्रल स्कूलने आयोजित केलेली 5 कि. मी. अंतराची मॅरेथॉन शर्यत आज सकाळी उत्साहात पार पडली. या शर्यतीत मुलांच्या गटात साहिल कुमार आणि पालकांच्या गटात संतोष सिंग हे विजेते ठरले.
सदर शर्यतीत सुमारे 1 हजार धावपटूंनी भाग घेतला होता. आज शनिवारी सकाळी प्रमुख पाहुण्या गुन्हे आणि रहदारी विभागाच्या डीसीपी यशोदा वंटगुडी यांनी ध्वज दाखवून शर्यतीचा शुभारंभ केला. याप्रसंगी एसबीजी ग्रुपच्या व्यवस्थापकीय संचालिका प्रेरणा घाटगे, नारी शक्तीच्या अध्यक्षा सफिना जोसेफ, गुड शेफर्ड स्कूलच्या मुख्याध्यापिका सरला कोसराजू आदी निमंत्रित पाहुणे म्हणून उपस्थित होते.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात डीसीपी यशोदा वंटगुडी यांनी प्रारंभी मॅरेथॉन शर्यतीत सहभागी सर्व धावपटूंचे अभिनंदन करून नवीन वर्षात अशाप्रकारे व्यायामाद्वारे कायम तंदुरुस्त रहा अशा शुभेच्छा दिल्या. तंदुरुस्त आरोग्य शिवाय जीवनात काहीच साध्य करता येत नाही. यासाठी विद्यार्थी व पालकांसह समस्त नागरिकांनी तंदुरुस्त राहावे. यासाठी सकाळी फिरायला जाणे, धावणे आदी प्रकारचे व्यायाम करण्याची सवय लावून घ्यावी. खास करून महिलांनी आपल्या आरोग्याची अधिक काळजी घ्यावी, असे वंटगुडी म्हणाल्या. मुख्याध्यापिका सरला कोसराजू यांनीही समयोचित विचार व्यक्त केले.
गुड शेफर्ड सेंट्रल स्कूलच्या मैदानावरून सुरू झालेली ही 5 कि. मी. अंतराची मॅरेथॉन शर्यत रामघाट रोड मार्गे शौर्य सर्कल, क्लब रोड, हर्षा इलेक्ट्रॉनिक्स, गोल्फ क्लब मार्ग पुन्हा गुड शेफर्ड स्कूल येथे समाप्त झाली. या शर्यतीतील मुलांच्या गटात साहिल कुमार याने तर पालकांच्या गटात संतोष सिंग यांनी प्रथम क्रमांक मिळवला या उभयतांना आकर्षक पारितोषिक देण्यात आले. त्याचप्रमाणे आजोबा- आजींच्या गटात फ्रान्सिस डेव्हिड हे विजेते ठरले. याखेरीज मुलांच्या व पालकांच्या गटातील जय बेनके, अमर शिंदे, श्रेया पोटे, चंदन होडगे, संजय पाटील व उर्मिला देवी या यशस्वी धावपटूंना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.