रविवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी येळूर प्राथमिक शाळेच्या पटांगणात राष्ट्रपिता महात्मा गांधी संमेलन नगरीत संपन्न होणाऱ्या पंधराव्या येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक उद्धव कांबळे यांची निवड करण्यात आली असून चार सत्रात हे संमेलन संपन्न होणार आहे. यंदाच्या वर्षी रसिकांसाठी खास आकर्षण म्हणजे सिने अभिनेता सचिन खेडेकर हे संमेलनाला उपस्थित राहणार आहेत.
उद्धव कांबळे यांनी पोलीस खात्यात सनदी अधिकारी म्हणून काम केले असून काम करत असतानाच अनेक पुस्तके लिहिली आहेत. त्यांचा जन्म : १९५२ , कदेर ( ता . उमरगा , जि . उस्मानाबाद ) येथे झाला असून त्यांचे शिक्षण एम . ए . ( समाजशास्त्र ) झाले आहे १्यानंतर १९८३ सालापर्यंत ( ६ वर्षे ) लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयात समाजशास्त्र विषयाचे अध्यापन केले. १९८३ साली संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेद्वारे भारतीय पोलीस सेवेत प्रवेश मिळविला. ही परीक्षा मराठी माध्यमातून उत्तीर्ण होणारे पहिले महाराष्ट्रीय अधिकारी आहेत. महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये पोलीस अधीक्षक , पोलीस आयुक्त , पोलीस महानिरीक्षक अशी पदे भूषवल्यानंतर २०१२ साली होमगार्ड व नागरी संरक्षक विभागातून अपर पोलीस महासंचालक म्हणून निवृत्त.
उद्धव कांबळे यांचे इतर प्रकाशित लेखन ग्रंथ : कालबद्ध निर्मिती : दिशा आणि तंत्र, भारतीय राजकारणातील पोकळ धर्मनिरपेक्षता, ( आगामी ) एनजीओ : साम्राज्यवाद्यांचे हस्तक, ( आगामी ).
पुस्तिका व लेख : लोकशाही मार्गाने येणारा फॅसिझम, अमेरिकन अर्थसत्ता : भ्रम आणि वास्तव, अमेरिकन मंदी : खरी किती , खोटी किती ?, मानवी हक्क : तत्त्व आणि दिशाभूल.
यंदा या साहित्य संमेलनाचे खास आकर्षण म्हणजे चित्रपट कलावंत सचिन खेडेकर यांची उपस्थिती होय. सचिन खेडेकर हे मराठी आणि हिंदी रंगभूमीवरील ख्यातनाम अभिनेते असून त्यांनी तेलगू, तमीळ, मल्याळम, गुजराती चित्रपटांमध्ये सुद्धा भूमिका केल्या आहेत. हिंदीमधील त्यांच्या सिंघम, अग्निपथ, पोस्टर बॉईज, आपका सुरूर, अस्तित्व, अर्जुन पंडित, दाग, बिच्छू या मधील भूमिका गाजल्या होत्या. तसेच श्याम बेनेगल यांच्या नेताजी सुभाषचंद्र बोस चित्रपटात त्यांनी सुभाषचंद्र बोस यांची प्रमुख भूमिका केली होती.
मराठीमध्ये त्यांनी काम केलेल्या मी शिवाजीराजे भोसले बोलतोय, शिक्षणाच्या आईचा घो, कशाला उद्याची बात, फक्त लढ म्हणा, ताऱ्यांचे बेट, कोकणस्थ, जनता गॅरेज, राजवाडे सन्स, कच्चा लिंबू या चित्रपटातील भूमिका गाजल्या होत्या.
त्यांनी अनेक टीव्ही मालिकांमध्येही काम केले असून यामधील इम्तीहान तसेच संविधान या मालिका गाजल्या. संविधान या मालिकेत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका केली आहे. याशिवाय कोण होईल मराठी करोडपती या मालिकेचे त्यांनी सूत्रसंचालन केले होते.