रोटरी क्लब ऑफ बेळगावच्या वतीने आयोजित करण्यात आलेला रोटरी अन्नोत्सव 2020 येत्या 10 जानेवारी ते 19 जानेवारीपर्यंत सी.पी.एड. कॉलेज मैदानावर होणार आहे ’अशी माहिती या उपक्रमाचे चेअरमन रो. बसवराज विभूती यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
अन्न ही प्रत्येकाची गरज आहे तसे वेगवेगळ्या समाजात वेगवेगळ्या प्रकारची खाण्यापिण्याची आवड असते. मराठा, ब्राह्मण, जैन, लिंगायत, मुस्लिम, गुजराती, मारवाडी, सिंधी, सावजी व बोहरी अशा सर्व समाजाचे लोक बेळगावात राहतात, त्या प्रत्येकाच्या चालीरीती जशा विभिन्न आहेत तशीच त्यांची खाण्यापिण्याची आवडही वेगवेगळी आहे. या सर्व समाजाच्या लोकांना एकत्र आणून त्यांच्या आवडीनुसार खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने 1997 मध्ये रोटरी क्लबने प्रथम अन्नोत्सव या उपक्रमाची सुरुवात केली.
रो. अविनाश पोतदार यांच्या समर्थ नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या उपक्रमाने यशाची उंची गाठत एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे संजीव कपुर, विट्ठल कामत, विष्णू मनोहर, सई ताम्हणकर, गायक अमित गुप्ता यासारख्या प्रख्यात सेलेब्रिटीज़नी भेट देवून या उपक्रमाचे कौतूक केले आहे. अन्नोत्सव हा जरी रोटरी क्लबचा उपक्रम असला तरीही तो बेळगावकरांच्या आवडीचा उत्सव झाला आहे. गेल्या काही वर्षात स्टॉल धारकांचा जो प्रचंड प्रतिसाद मिळत आहे आणि खवय्यांची गर्दी होत आहे, ती पाहता रोटरीने त्यात आमुलाग्र बदल केला आहे. या उत्सवात देशाच्या विविध भागातून आलेले 100 हून अधिक स्टॉल्स सहभागी होत असून त्यामध्ये काश्मीर, जयपुर, गोवा, कोल्हापूर, सातारा आणि नवी दिल्ली येथील प्रख्यात खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आहेत. काश्मिरी वाजवान पासून तोंडाला पाणी सोडणारे कोल्हापुरी मटन, चिकन विविध प्रकारचे मासे तसेच सदाबहार शाकाहारी जेवणाचे स्टॉल ही राहणार आहेत.
अन्नोत्सव हे रो. बसवराज विभूति यांच्या चेयरमनशिप खाली 30 कार्यकर्ते सातत्याने कार्यरत आहेत. रोटरीचे अध्यक्ष जीवन खटाव, चिटणीस प्रमोद अग्रवाल यांच्यासह मुकुंद बंग, शरद पै , बकुल जोशी, संजय कुलकर्णी, मनोज हुईलगोळ, दिपेन शाह, पराग भंडारे, सचिन सबनीस, तुषार कुलकर्णी, नितीन गुजर, सचिन बिच्चू, मनोज पै, योगेश कुलकर्णी, विशाल कुलकर्णी, निरंजन संत, अक्षय कुलकर्णी, अमित साठ्ये, सुहास चांडक व मनोज मायकेल यांच्यासह अनेक कार्यकर्ते त्यामध्ये कार्यरत आहेत .
रोटरी क्लबने विविध उपक्रम व अन्नोत्सवमध्ये मिळवलेला पैसा सामाजिक कामासाठी खर्च केला आहे. बेळगाव शहरात उभारण्यात आलेले टॉयलेट ब्लॉक्स, नेत्रपेढी, त्वचापेढी, ऍम्ब्युलन्स आणि अनेक शैक्षणिक संस्थांना रोटरीने मदत केली आहे. या वर्षी मिळालेल्या पैशातून लोकोपयोगी उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत दि. 10 ते 19 जानेवारीपर्यंत रोज सायंकाळी पाच ते दहा या वेळात अन्नोत्सव सुरू होईल.