क्रिकेटच्या माध्यमातून जपानमधील सॅनो शहराच्या स्थानिक पुनरुज्जीवनासाठी ‘द सॅनो क्रिकेट चॅलेंज (एससीसी) प्रोजेक्ट’ या जपान सरकारच्या मदतीतून चालणाऱ्या प्रकल्पाने बेळगावच्या जॉय प्लॅनेट हॉलिडे (जेपीएच) एजन्सीची भारत व सॅनो यांच्यातील संबंध दृढ होण्यासाठी नियुक्ती केली आहे.
यासंदर्भात द सॅनो क्रिकेट चॅलेंज प्रोजेक्टचे महाव्यवस्थापक योशिओ अकियामा आणि जपानमधील क्रिकेटचे प्रमुख कुशल कामत यांनी नुकतीच बेळगावला भेट दिली. याप्रसंगी जॉय प्लॅनेट हॉलिडेजचे व्यवस्थापकीय संचालक पार्थ कामत यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना कुशल कामत म्हणाले की, राजधानी टोकियो शहरापासून सुमारे 70 किलोमीटर अंतरावर असणारे सॅनो हे शहर जपानमधील क्रिकेटची पंढरी म्हणून सुपरिचित आहे. जपानमधील ते एकमेव शहर असे आहे की ज्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय क्रिकेट कौन्सिलची (आयसीसी) मान्यता असलेले आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट मैदान आहे.
सॅनो शहर क्रिकेटसाठी जगप्रसिद्ध व्हावे यासाठी जपान सरकारला पर्यटक, क्रिकेट क्लब्स्, गुंतवणूकदार आदींना आपल्याकडे आकर्षित करावयाचे आहे. यासाठीच बेळगावच्या जीपीएच एजन्सीची नियुक्ती करण्यात आली आहे, असे कुशल कामत यांनी सांगितले.
जपानमधील अन्य बऱ्याच शहरांप्रमाणे सॅनो शहराला स्थानिक लोकसंख्येत घट होण्याच्या गंभीर समस्येला तोंड द्यावे लागत आहे. परिणामी दरवर्षी शहराची अर्थव्यवस्था ढासळत चालली आहे. तेंव्हा भविष्यातील गंभीर परिणाम लक्षात घेऊन खबरदारी घेताना क्रिकेटचा उपयोग करून शहराच्या अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सॅनो शहराचे स्थानिक प्रशासन आणि जपान सरकारने 2018 साली द सॅनो क्रिकेट चॅलेंज प्रोजेक्ट सुरू केल्याचे कामत यांनी स्पष्ट केले.
संपूर्ण जगात भारतामध्ये क्रिकेटसाठी मोठी बाजारपेठ आहे हे निर्विवाद. त्यामुळेच भारत आणि सॅनो यांच्यातील संबंध दृढ करणे हे एससीसी प्रकल्पाचे पहिले ध्येय असणार आहे. तथापी एससीसी प्रकल्पाचे ध्येय फक्त सॅनोमधील पर्यटकांची संख्या वाढविणे हे नसून भारतीय उद्योग समूहांना आणि शैक्षणिक संस्थांना आकर्षित करणे हे देखील आहे. शिवाय यासाठी जपान सरकारकडून खरे पारंपारिक जपानी राहणीमान अनुभवण्याची उत्कृष्ट संधी उपलब्ध करून दिली जाणार असल्याचेही कुशल कामत यांनी सांगितले.