कंग्राळी खुर्द शाळेच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा सरकारी आदर्श प्राथमिक मराठी मुलामुलींची शाळा कंग्राळी खुर्दच्या माजी माजी विद्यार्थ्यांतर्फे आयोजित गुरुवंदना आणि विद्यार्थी स्नेहमेळावा असा संयुक्त कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला.
शिवराय गल्ली, रामनगर चौथा क्रॉस कंग्राळी खुर्द येथील राम कृष्ण हरी मंगल कार्यालयाच्या सभागृहांमध्ये या गुरुवंदना व विद्यार्थी स्नेहमेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. स्नेहमेळाव्यास इ.स. 1986 ते 1993 या कालावधीत शाळेत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थी विद्यार्थिनींची उपस्थिती होती. स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर सीमा पाटील यांनी उपस्थितांचे स्वागत केले प्रास्ताविक भाषणात सारिका पाटील यांनी गुरुवंदना व विद्यार्थी स्नेह मेळाव्याच्या आयोजना मागील उद्देश स्पष्ट केला. या संयुक्त कार्यक्रमांचे उद्घाटन व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी शिक्षक व माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते श्री सरस्वती पूजन आणि शिवरायांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या सर्व आजी-माजी शिक्षकांचा माजी विद्यार्थ्यांच्या हस्ते पुष्पगुच्छ तसेच शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी माजी विद्यार्थी विद्यार्थिनींची समयोचित भाषणे झाली. त्यांनी आपल्या भाषणात शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला तसेच आपल्याला घडविणाऱ्या शिक्षक वर्गाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या सत्काराला उत्तर देताना शिक्षकवर्गानेही आपले मार्गदर्शनपर विचार व्यक्त केले.
गुरूवंदना व विद्यार्थी स्नेहमेळाव्यास शिक्षक साने सर, देसाई सर, चांगरे सर, शहापूरकर, उपाध्ये, दुधळे सर जगापुरे सर, कुंडेकर सर, चौगुले सर, मादार टीचर, नेसरकर टीचर, काकडे टीचर, देशपांडे टीचर, पाटील टीचर आदींसह शाळेचे माजी विद्यार्थी- विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपाली जाधव यांनी केले, तर संगीता देसाई यांनी सर्वांचे आभार मानले. विद्यार्थी स्नेहमेळाव्यात शालेय जीवनानंतर बऱ्याच वर्षांनी समाजातील एक जबाबदार नागरिक या भूमिकेत प्रथमच एकमेकांना भेटणाऱ्या माजी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यांवर जुन्या मित्र-मैत्रिणींना भेटल्याचा आनंद ओसंडून वाहताना दिसत होता.