घटप्रभा ते चिकोडी दरम्यानचा नूतन दुपदरी रेल्वेमार्ग लोकार्पण करण्याचा समारंभ बुधवारी मोठ्या उत्साहात पार पडला. या नव्या रेल्वेमार्गावर घटप्रभा, बागेवाडी व चिकोडी ही स्थानके लागणार असून सदर रेल्वेमार्गामुळे रेल्वे वाहतुकीत वाढ होण्याबरोबरच क्रॉसिंग टाळण्यास मदत होणार आहे.
केंद्रीय राज्य रेल्वेमंत्री सुरेश अंगडी यांच्या हस्ते घटप्रभा ते चिकोडी दरम्यान नव्याने उभारण्यात आलेला दूपदरी रेल्वे मार्ग लोकार्पण करण्याचा समारंभ बुधवारी पार पडला.
या समारंभात प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक झाल्यानंतर रेल्वेमंत्री अंगडी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले. याप्रसंगी व्यासपीठावर राज्यसभा सदस्य प्रभाकर कोरे, खासदार आण्णासाहेब जोल्ले, आमदार दुर्योधन एहोळे, महांतेश कवटगीमठ आदी उपस्थित होते. रेल्वे मार्ग लोकार्पण केल्यानंतर बोलताना केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांनी आपल्या भाषणात म्हणाले की, पुणे मिरज लोंढा दरम्यानचे रेल्वे मार्ग दुपदरी करणाचे काम एकदा का पूर्ण झाले की मग कर्नाटक महाराष्ट्र आणि गोवा राज्ये एकमेकांना रेल्वे मार्गाने चांगली जोडली जातील, तसेच रेल्वेसेवा अधिक सुरळीत होईल. शेतकऱ्यांसाठी शीतगृह अर्थात कोल्ड स्टोअरेज उभारण्याची जबाबदारी रेल्वे खात्याचे नाही मात्र याकामी कोणी पुढाकार घेत असल्यास रेल्वे खाते त्यांना सहकार्य करण्यास तयार आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यसभा सदस्य प्रभाकर कोरे यांनी आपल्या भाषणात घटाप्रभा परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात भाजीपाला पिकवितात त्यामुळे त्यांच्यासाठी कोल्ड स्टोअरेज उभारणे गरजेचे आहे असे सांगितले. देशाच्या स्वातंत्र्यानंतर केंद्रीय रेल्वेमंत्री होण्याचा मान मिळणारे कर्नाटकातील सुरेश अंगडी हे 12वे मंत्री आहेत. यापूर्वीच्या अकरा मंत्र्यांनी कोणतेही महत्त्वाचे प्रकल्प राबविलेले नाहीत परंतु आता मोदी सरकारमध्ये रेल्वेमंत्री असणाऱ्या सुरेश अंगडी यांनी आतापर्यंत आदर्शवत कार्य केले आहे. आता त्यांच्याकडून बेळगाव कित्तूर धारवाड रेल्वेसेवा देखील लवकरच सुरू करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जावेत ही अपेक्षा आहे, असेही कोरे म्हणाले.
अण्णासाहेब जोल्ले यांनी मंत्री सुरेश अंगडी यांच्या या कार्याचा गौरव करून रेल्वे खात्याशी संबंधित गेल्या अनेक वर्षापासूनच्या ते मार्गी लावत असल्याचे सांगितले. सदर समारंभास निमंत्रितांसह रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.