बेळगाव तालुका पंचायतीमधील नियोजित ई-ऑफिसच्या साहित्याची खरेदी करण्यासाठी जिल्हा पंचायतीने ई-निविदा मागविल्या असून त्या येत्या 7 जानेवारी रोजी उघडल्या जाणार आहेत. सदर निविदा भरण्याची अंतिम तारीख शनिवार दि. 28 डिसेंबर ही असून इच्छुकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन जिल्हा पंचायतीने केले आहे.
केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून राज्यातील सर्व जिल्ह्यातील प्रत्येक तालुका पंचायतीमध्ये ई-ऑफिस सुरू केले जाणार आहे. या ऑफिसच्या माध्यमातून सर्व तालुका पंचायतीमधून ऑनलाईन सेवा दिल्या जाणार आहेत. यासाठी लागणारे संगणक, संगणक साहित्य, प्रिंटर, स्कॅनर आदी साहित्यांची खरेदी केली जाणार आहे. यासाठी 51 लाख 55 हजार 200 रुपये संभाव्य खर्च करण्याचा निर्णय जिल्हा पंचायतीने घेतला आहे.
इच्छुकांना ऑनलाइन निविदा भरताना सर्व कागदपत्रे स्कॅन करून अर्जात म्हटल्याप्रमाणे अपलोड करावी लागणार आहेत. त्याचप्रमाणे निविदा भरण्यापूर्वी 1 लाख 5 हजार रुपयांचा डीडी जिल्हा पंचायतीचे नावे भरावा लागणार आहे. यासंदर्भातील अधिक माहितीसाठी वेबसाईट: www.eproc.karnataka.gov.in या संकेत स्थळाला भेट अथवा जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र के. व्ही. यांना भेटण्याचे आवाहन बेळगाव जिल्हा पंचायतीकडून करण्यात आले आहे.