महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, मराठी विद्यार्थी संघटना आणि निलजी ग्रामस्थांमार्फत निलजी गावाच्या बससेवेसंदर्भात आज शुक्रवारी जिल्हा परिवहन नियंत्रणाधिकारी मुंजी, आणि घटक 2 चे प्रबंधक श्री लाठी याना निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र एकीकरण युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील, सरचिटणीस श्रीकांत कदम व ग्रामीण संघटक रोहित गोमानाचे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन सादर करण्यात आले. बेळगाव बस स्थानकापासून जवळपास 7 कि.मी. अंतरावर निलजी हे गाव आहे. गावातील जवळपास 50 विद्यार्थी, अनेक महिला आणि जेष्ठ नागरिकांना आपल्या शिक्षणासाठी आणि दैनंदिन व्यवहारासाठी शहरात यावे लागते, पण सकाळच्या सत्रातील एक बस फेरी सोडली तर त्यानंतर एकसुद्धा बस गावामध्ये येत नाही.
परिणामी सर्वांना बसचा प्रवास करण्यासाठी गावच्या बाहेर जवळपास 1 की.मी. पायपीट करून सांबरा, मुतगा मार्गावरून येणाऱ्या बसचा पर्याय असतो. तथापि त्यामार्गे येणाऱ्या बसगाड्या निलजी बस स्थानकावर न थांबता सुसाट निघून जातात. त्यामुळे सर्वात जास्त विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे, त्याचबरोबर शारीरिक , मानसिक त्रास होत आहेत. तेंव्हा समस्त म. ए. युवा समिती आणि निलजी ग्रामस्थांच्यावतीने आपल्याला विनंती आहे की, निलजी गावासाठी पूर्ण दिवस फेऱ्या उपलब्ध असलेली बसची व्यवस्था करावी. यासाठी यापूर्वी आपल्याला वेळोवेळी निवेदने सुद्धा देण्यात आली आहेत.
तेंव्हा आता सदर निवेदनाचा गांभीर्याने विचार व्हावा अन्यथा आम्हाला उग्र आंदोलन छेडावे लागेल असा इशारा देत आहोत, अशा आशयाचा तपशील निवेदनात नमूद आहे.याप्रसंगी अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. तथापी विद्यार्थी आक्रमक होताच येत्या मंगळवारपर्यंत बसची व्यवस्था करण्याचे आश्वासन देण्यात आले.
यावेळी अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष धनंजय पाटील,
सरचिटणीस श्रीकांत कदम, ग्रामीण संघटक रोहित गोमानाचे, विशाल गौडाडकर, चिटणीस किशोर मराठे, किरण मोदगेकर, ता. पं. सदस्य वसंत सुतार, शिवराम देसाई, विद्यार्थी संघटनेचे सिद्धार्थ चौगुले, अश्वजित चौधरी, ओमकार चौगुले, जोतिबा पाटील, आशिष कोचेरी यांच्यासह इतर विद्यार्थी- विद्यार्थिनी उपस्थित होते.