Friday, January 17, 2025

/

बेळगावात बस वडापने प्रवास करणाऱ्या महिला असुरक्षित?

 belgaum

कडोली येथे नुकत्याच घडलेल्या 6 वर्षाच्या बालिकेवरील बलात्काराच्या घटनेनंतर शहरातील महिला व मुलीबाळींना आपण बेळगावात सुरक्षित आहोत का? असा प्रश्न पडू लागला आहे. विशेष करून दररोज बस आणि ऑटोरिक्षामधून प्रवास करणाऱ्या मुलींना आता दिल्ली किंवा हैदराबाद प्रमाणे बेळगाव असुरक्षित वाटू लागले आहे.
यासंदर्भात चाचपणी केली असता महिला आणि मुलींनी बस अथवा वडाप ऑटोरिक्षातील प्रवासादरम्यान आपल्याला वाईट अनुभव आल्याचे सांगितले. यापैकी बहुतांश युवती व महिलांच्या बाबतीत युवकांकडून अश्लील चेष्टा अथवा छेडछाड करण्याचा प्रकार घडला आहे. चीड आणणारी गोष्ट म्हणजे हे प्रकार घडत असताना आसपासचे नागरिक अथवा प्रवास मात्र थंडपणे सारा प्रकार पहात असतात.
नम्रता (नाव बदललेले) ही युवती ती गेल्या एक वर्षापासून के.एस.आर.टी.सी. बसमधून राणी चन्नम्मा विद्यापीठापर्यंत (आर.सी.यु) प्रवास करते. या प्रवासादरम्यान मला आणि माझ्या मैत्रिणीला टारगट युवक आणि बस चालकाकडूनही सातत्याने त्रास दिला जातो. संबंधित टारगट युवक बसमधील गर्दीचा फायदा घेऊन मुलींना मुद्दाम ढकलाढकली करणे किंवा अश्लील चेष्टा करणे असे प्रकार करत असतात, असे नम्रता हिने सांगितले.

आर.सी.यु.ला जाणाऱ्या बसमधून दररोज प्रवास करणाऱ्या अपेक्षा (नाव बदललेले) नामक कॉलेज तरुणीने तर आपल्या बाबतीत अत्यंत चीड आणणारा प्रकार घडल्याचे सांगितले. बसमधील महिलांसाठी राखीव असलेल्या जागेवर रुमाल टाकून जागा अडवून धरलेल्या एका तरुणाला जाब विचारला असता त्याने आपल्या मैत्रिणीसाठी जागा पडल्याचे सांगितले. त्यावर आक्षेप घेऊन अपेक्षा त्या जागेवर बसताच त्या मुलाने तिच्या केसांना धरून तिला जबरदस्तीने त्या जागेवरून उठविले. तेंव्हा संतापलेल्या अपेक्षाने त्या युवकाच्या थोबाडात मारले. हा प्रकार घडत असताना आसपासच्या प्रवाशांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली होती. आपल्या आसपास जर अशी परिस्थिती असेल, तर महिला व युवती कशा सुरक्षित राहतील असा सवाल अपेक्षा हिने केला.

Bus  traveling women
Bus traveling women

शहरातील अनेक शाळकरी मुली कित्तूर चन्नम्मा येथून दररोज बसने ये-जा करतात. त्यांनादेखील बसमधील टारगट मुलांचा त्रास सहन करावा लागतो. अश्लील चेष्टा आणि छेडछाड करणाऱ्या या मुलांना अलीकडेच कविता या त्रस्त मुलीच्या परिचयातील पोलीस व्यक्तीने ताकीद दिली. त्यानंतर छेडछाडीचा प्रकार थांबला होता. प्रत्येक पालक जर आपल्याच मुलीच्या सुरक्षततेची काळजी करू लागला तर परिस्थिती बदलणार कशी असा सवालही त्रस्त मुलींनी केला आहे.

दरम्यान या संदर्भात पोलीस खात्याशी संपर्क साधला असता लवकरच शहरातील प्रत्येक शाळा कॉलेजमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. या कार्यक्रमात त्रास देणाऱ्या टारगट मुलांना अथवा मवाल्यांना कशाप्रकारे हाताळावे स्वतःचे आत्मसंरक्षण कसे करावे आदीबाबत मार्गदर्शन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. त्याचप्रमाणे तात्काळ मदतीसाठी कोणत्या दूरध्वनी क्रमांकावर पोलिसांना कळवायचे याचीही माहिती दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.