खानापूर तालुक्यातील कणकुंबी जवळील पारवाड येथे गुरुवारी रात्री एका घरातील पाच वर्षीय बालकावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. यामुळे एकच खळबळ माजली असून वनखात्याने याकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
खानापूर तालुक्यात वारंवार अशा घटना घडत आहेत. त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले असून वेळीच वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे. पारवाड येथील गौळीवाडा या गावात बिबट्याने हल्ला केला आहे.
बिबट्याच्या हल्ल्यामुळे गावातील श्याम बाळू शिंदे (5) हा बालक गंभीर जखमी झाला आहे. त्याला बेळगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
नेहमीप्रमाणेच घरात खेळत असताना बिबट्याने घरामध्ये शिरून श्यामवर हल्ला केला आणि गळ्याचा चावा घेतला आहे. त्यामुळे बालक जखमी झाला आहे. ही घटना गंभीर असून याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे.
ही बातमी कणकुंबी आरएफओ कविता यरनाट्टी आणि कर्मचारी देण्यात आली. त्यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होऊन बालकाला तातीने बेळगाव येथील खासगी रुग्णालयात हलविले आहे. मुलावर रुग्णालयाच्या आपत्कालीन विभागात उपचार सुरू आहेत. बिबट्याच्या हल्ल्यामुळे गावात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.