डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिली नाही, असे वक्तव्य शिक्षण विभागाचे मुख्य सचिव उमाशंकर यांनी केले आहे. याचबरोबर शिक्षण मंत्री सुरेशकुमार यांनीही त्याला होकार देत विद्यार्थ्यांमध्ये गैरसमज निर्माण केला आहे. तेंव्हा उमाशंकर यांच्यावर कठोर कारवाई करावी. याचबरोबर शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, यासाठी विविध दलित संघटनांनी कित्तूर चन्नम्मा चौक येथे रास्तारोको करून जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले.यावेळी उमा शंकर यांचा पुतळा जाळला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिली आहे. त्यांच्या घटनेवरच देश चालतो. असे असताना त्यांनी घटना लिहिली नाही म्हणून अवमान करणे हे अत्यंत चुकीचे आहे. अशाप्रकारे जर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान करण्यात येत असेल तर दलित संघटना गप्प बसणार नाहीत, असा इशारा देखील दिला आहे.
डिसेंबर 26 रोजी संविधान दिवस म्हणून सर्व शाळांमध्ये साजरा करावा, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र उमाशंकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल गैरसमज पसरविला आहे. तसेच शाळांमध्ये संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे काहीच गरज नाही, असे वक्तव्य त्यांनी केले आहे. यामुळे भाजपच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करण्यात आली आहे. तातडीने त्यांच्यावर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला आहे.
अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मल्लेश चौगुले, गजानन देवरमनी, दुर्गेश मेत्री, मल्लेश कुरंगी, सागर चौगुले, महेश गाडीवड्डर, संतोष हलगेकर, गौतम लोंढे, अर्जुन देमट्टी, महेश कांबळे, दीपक मेत्री, यांच्यासह दलित संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते..