बेळगाव शहराला वेढलेल्या पाण्यातून सुटका करायची असल्यास पाऊस पूर्ण थांबणे गरजेचे आहे. पण पाऊस थांबत नसून कधी उघडीप, कधी जोरात वारा तर जोरात पावसाचा मारा अशी परिस्थिती निर्माण होत आहे. यामुळे साचलेले पाणी काही प्रमाणात ओसरत आहे तर पाणी भिंतीत जिरून घरे कोसळत आहेत.
एस पी एम रोड भागात दुसरं घर कोसळलं आहे. एस पी एम रोड दुसरा क्रॉस येथे पावसाच्या दणक्याने आणखी एक घर कोसळून लाखोंचे नुकसान झाले आहे.बुधवारी रात्री विलास दत्ताराम गंगाधर ,घर नं 316 यांच्या मालकीचे कौलारु घर कोसळलं आहे. हे कुटुंब उघड्यावर आले आहे.
वडगांव येथेही घर कोसळण्याची घटना घडली आहे.पाटील गल्ली येथील कल्लाप्पा बाळेकुंद्री यांचे घर देखील पावसाने कोसळलं आहे.तलाठी आणि सर्कल यांनी पहाणी करून पंचनामा केला आहे.या घटनेत हजारोंचे नुकसान झाले आहे.
शहरात घरांची पडझड जोरात आहे.सततच्या संततधार वृष्टीमुळे बेळगाव शहर परिसरात घरांची पडझड वाढली आहे.बुधवारी रात्री आठल्ये गुरुजी रोड शास्त्रीनगर येथील ज्योतिराव वायांगडे यांच्या मालकीचे कौलारू घर कोसळून लाखोंचे नुकसान झाले आहे.
घर जरी कौलारू असले तरी आत सामान अडकल्याने वीस लाखांचे नुकसान झाल्याची माहीती घर मालकाने दिली आहे.
काल रात्री हे घर कोसळले असून सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही. घरातील सदस्य सगळे जण वेळेत बाहेर पडले होते.गुरुवारी दुपार पर्यंत कुणीही पहाणी केली नव्हती नुकसान भरपाई मिळवून द्यावी अशी मागणी केली जात आहे. भांदुर गल्ली पाटील मळ्यात अनेक घरे कोसळली आहेत गुरुवारी रात्री पंधरा घरे या भागात पडली आहेत.पाऊस 24 तास पूर्ण थांबला तरच पाणी ओसरून घरांची पडझड थांबू शकते. आता वरुण राजाने ही कृपा करण्याची गरज आहे.