अनगोळ परिसरातील रामनाथ मंगल कार्यालयाच्या समोरील भागात पाणीपुरवठा करणाऱ्या लाईन ला लिकेज होऊन गेल्या 25 दिवसांपासून पाणी वाया जात आहे. हे पाणी गटारीत मिसळून थेट वाया जात असूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले असून पाणीपुरवठा मंडळाच्या गलथान कारभाराबद्दल भागातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत .
त्या संदर्भात पाणीपुरवठा मंडळाचे अधिकारी मंजुनाथ आणि त्यांच्या कार्यालयातील कर्मचार्यांना ही कल्पना देण्यात आली असली तरी या समस्येकडे आम्ही सोमवार नंतर बघू असे उत्तर त्या भागातील नगरसेवक आणि इतर नागरिकांना देण्यात आले आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहेत.
सध्या पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात आहे , ऊन जास्त आहे अशा प्रकारे पाणी वाया जात राहिल्यास पाणीसाठा संपून नागरिकांना तहानलेले राहण्याची वेळ येणार आहे. याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी त्यांची मागणी आहे.
बेळगाव शहर आणि परिसरात अनेक भागात या प्रकारे लिकेज होऊन पाणी वाया जाऊ लागले असून पाणीपुरवठा मंडळाचा गलथान कारभार समोर येत आहे. याकडे लक्ष देऊन तातडीने पाणीपुरवठा विभागाने दुरुस्ती काम करावे अशी मागणी होत आहे. रस्त्यात पाणी साचून ते ये जा करणाऱ्या वाहनांमुळे नागरिकांच्या अंगावर उडत आहे. तसेच ते पाणी गटारात मिसळत आहे त्याची दखल घेण्यात यावी अशी मागणी नगरसेवक विनायक गुंजकर यांनी केली आहे.