लोकसभा निवडणुका पार पडल्या असल्या तरी बेफिकीर राहून चालणार नाही. मतमोजणी गुरुवार दिनांक 23 रोजी होणार आहे. त्यामुळे आरपीडी आणि इतर परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवावा अशी मागणी होत आहे.
मतमोजणी निकालानंतर विजयी मंडळींचा जल्लोष आणि हारलेल्यात धीरगंभीर वातावरण असते ,कुठेही ठिणगी पडून भडका उडू शकतो. कायदा व सुव्यवस्थेला बाधा येणार नाही याची दक्षता पोलिस अधिकाऱ्यांनी घ्यावी लागणार आहे.
निर्धास्तपणे राहून वादाला तोंड फुटताना बघ्याची भूमिका घेतल्यास मोठा वादंग उठू शकतो. बेळगाव पोलीस आयुक्तांनी निवडणुकीसाठी पोलिस बंदोबस्त करण्यावर भर दिला आहे एकूण 482 पोलीस बेळगावात दाखल होणार असून मतमोजणीसाठी कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. मात्र निकालानंतर धीर गंभीर परिस्थिती निर्माण होऊन तुरळक हाणामारीचे प्रकार गंभीर स्वरूप धारण करू शकतात याची दखल पोलिसांनी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
निवडणूक झाली तरी बंदोबस्ताचा खरा कस मतमोजणी दिवशीच असणार आहे. निकालादिवशी जिल्ह्यात तणावसदृश परिस्थिती असणार आहे. अशा परिस्थितीमध्ये कोणत्याही क्षणी राडा होऊ शकतो. त्यामुळे कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवून अशा घटनावर वेळीच मात केल्यास मतमोजणी शांततेत पार पडते अशी शक्यता आहे.
गुरुवार दिनांक 23 रोजी होणाऱ्या मतमोजणी संदर्भात मोठी धावपळ उडणार आहे. आपलाच उमेदवार येणार किंवा पडणार या वादात अनेक हाणामारीच्या घटना घडतील त्यामुळे पोलिसांनी अशा घटनांवर वेळीच हस्तक्षेप करून त्या तिथल्या तिथे मिटवून आळा घातल्यास मतमोजणी प्रक्रिया सुरळीत पार पडेल अशी शक्यता आहे.