मागील महिन्याभरापासून उष्म्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला आहे. पाणी आणि चारा टंचाईचे गंभीर सावट जिल्ह्यात पसरले आहे. त्यामुळे साऱ्यांचेच लक्ष आता मान्सून कडे लागून राहिले आहे.
वळीवाने महिन्याभरापूर्वी जोरदार हजेरी लावली होती. त्यामुळे काहीसा दिलासा साऱ्यांनाच मिळाला होता. मात्र पुन्हा दडी मारल्याने आणि म्हणावा तसा पाऊस न पडल्याने अनेकांची गोची झाली आहे. शेतकरी वर्गात नाराजीचा सूर उमटत आहे. जर आणखी काही दिवस वळवाने झोडपले असते तर शेतीकामाला वेग आला असता. मात्र तसे झाले नाही. त्यामुळे शेती कामे खोळंबली आहेत.
अजून तरी वळीव बरसण्याची लक्षणे दिसत नसली तरी मान्सून कडे मात्र साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. मान्सूनचे आगमन चार जून पासून होणार आहे असे हवामान खात्याने वर्तविली होते. मात्र आता 6 जून पर्यंत तो दाखल होईल अशी शक्यता आहे, आणखी पंधरवड्यात मान्सून बेळगावात दाखल होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
केरळमध्ये मान्सूनचे आगमन एक जून रोजी होण्याची शक्यता आहे. केरळच्या समुद्रकिनार्यावरून मान्सूनने गेल्या वर्षी 29 मे रोजी, 2017 मध्ये 30 मे रोजी धडक दिली होती. ती आता यावर्षी थोडा उशीर होणार असला तरी जोरदार पाऊस बरसणार अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अनेक गावात पाणी समस्या चारा समस्या याचबरोबर शेतीची खोळंबलेली कामे पूर्ण होण्यासाठी साऱ्यांचे डोळे आता मान्सून कडे लागून राहिले आहेत.