बायपास संदर्भात शेतकर्यांनी विरोध केलेला असतानाही पुन्हा शेत जमिनी संपादित करण्यासाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांना विरोध करण्यासाठी शेतकऱ्यांचा संघर्ष सुरू आहे. सलग तीन दिवस हा संघर्ष सुरू असून शेती बचाव समितीच्या माध्यमातून शेतकरी आपला विरोध दर्शवत आहेत.
सुरुवातीला मच्छे शेतामध्ये आक्रमण करण्याचा प्रयत्न झाला त्या वेळी शेतकर्यांनी विरोध केला असता तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांची नोटिस आणा असे उत्तर देण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना जाऊन निवेदन देऊन शेतकऱ्यांनी आपला विरोध दाखवला. पुन्हा दुसऱ्या दिवशी येळ्ळूर या भागातील शेत जमिनीवर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न बायपासच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी केला ,त्यावेळी शेतकर्यानी काम बंद करून परत पाठवले होते. आज पुन्हा अनगोळ भागातील शेती बचाव समितीचे सचिव सुभाष चौगुले यांच्या शेतातच अतिक्रमण करण्याचा प्रयत्न झाला त्या वेळी शेतकर्यांनी कब्जा असलेली नोटीस दाखवा अन्यथा काम करू देणार नाही अशी भूमिका घेतल्यामुळे हात हलवत अधिकाऱ्यांना परत जावे लागले आहे.
पोलिसांना हाताशी धरून काम सुरू होते मात्र पोलिसांसमोरच जमिनीचा कब्जा केल्याची नोटीस दाखवावी आणि काम करावे अशी भूमिका शेती बचाव समिती व इतर शेतकऱ्यांनी घेतली यामुळे पोलिसांसमोरच उघडे पडलेल्या अधिकाऱ्यांना परत जावे लागले आहे. बायपासला शेतकऱ्यांचा विरोध आहे. पिकावू जमीन ताब्यात न घेता कोरड्या जमिनीतून बायपास करावा अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे. मात्र अधिकारी पुन्हा एकदा आपली भूमिका पुढे रेटत असून त्यामुळे शेतकऱ्यांचा संघर्ष वाढत चालला आहे.
या भूसंपादन प्रक्रियेत नसलेल्या आणि भूसंपादनाची नोटीस न निघालेल्या शेतकऱ्यांच्या शेतातून बुलडोजर फिरवण्याचा प्रकार भूसंपादनाच्या अधिकाऱ्यांनी सुरू केला असून शेतकऱ्यांनी जागृतीने विरोध करावा काही अडचणी आल्यास शेती बचाव समितीला संपर्क साधून एकजुटीने लढावे असे आवाहन करण्यात आले आहे.