लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान दिनांक 23 रोजी पार पडले. बेळगाव आणि चिकोडी लोकसभा मतदारसंघाचा यामध्ये समावेश होता. मागील दोन महिन्यापासून निवडणूक कामात गुंतलेले अधिकारी 23 पासून मात्र सुटकेचा निश्वास घेताना दिसत आहेत. काही अधिकाऱ्यांनी तर कार्यालयाकडे येणे टाळले आहे.सोमवारपासून तरी सर्व सरकारी कामे सुरू होतील अशी आशा होती पण अजूनही अनेक अधिकारी व कर्मचारी विश्रांतीत असल्याने नागरिकांची कामे अडकून आहेत.
निर्विघ्नपणे मतदान पार पडल्याने सर्व अधिकारी सुटलो रे बाबा अशाच प्रतिक्रिया व्यक्त करताना दिसत आहेत. बेळगाव व चिकोडी मतदारसंघात मतदान सुरळीत पार पडले. मागील दोन महिन्यापासून सर्व खात्यातील अधिकारी या निवडणुकीच्या कामात दंग झाले होते. विशेष करून जिल्हाधिकारी आणि निवडणूक अधिकारी यांनी वारंवार बैठका घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. या पार्श्वभूमीवर अधिकारी कामात गुंतल्याचे दिसून आले. भरपूर काम लागले त्यामुळे विश्रांती पाहिजे पण निवडणूक होऊन पाच ते सहा दिवस उलटले तरी अनेकजण कामावर हजर झालेले नाहीत.
निवडणूक काळात अनेक नागरिकांना कार्यालयात गेल्यावर शुकशुकाट दिसत होता. दिनांक 23 रोजी मतदान झाल्याने आता जनतेची कामे होणार असे वाटू लागले होते. मात्र काही अधिकारी अजूनही कार्यालयात हजर झाले नसल्याचे दिसून येत असून शुकशुकाट कायम आहे.
बेळगाव लोकसभा मतदारसंघात एकूण 57 उमेदवार बसले होते तर चिकोडी मतदार संघात अकरा उमेदवार होते. या सर्व प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अधिकाऱ्यांचे नाकी नऊ वाजले होते. कधी एकदा मतदान होते याकडे साऱ्यांचे डोळे लागून होते. दिनांक 23 रोजी मतदान झाल्याने सुटलो रे बाबा अशा प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.
संबंधित उमेदवाराच्या खर्चाचा अहवाल कोणतेही अनधिकृत घटना, मद्यसाठा जप्त यासह इतर अनेक गैरकारभारावर नजर ठेवण्यासाठी पोलिस प्रशासन गुंतले होते. याचा फायदा चोरट्याने चांगला घेतला. मात्र मतदान झाल्यानंतर तरी अधिकारी कामात लागतील असे असताना अजूनही अनेक कार्यालयात अधिकाऱ्यांनी पाऊल ठेवले नाही. त्यामुळे यापुढे आता जनतेच्या कामाचा खेळखंडोबा होतो. निवडणूक प्रक्रियेतून बाहेर पडलेल्या अधिकाऱ्यांनी आतातरी कार्यालयाकडे येऊन जनतेच्या कामाकडे लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.