हे शीर्षक वाचून तुम्हाला शॉक बसला काय? पण हे खरे आहे, मच्छे येथे भर उन्हाळ्यात पाण्याचा एक झरा सापडला आहे आणि अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.
या गावातील जुन्या तलावाला जिवंत करायचे काम डॉ माधव प्रभू यांची संस्था प्यास फौंडेशन करत आहे. हे काम सुरू असताना हा झरा लागला आहे. जमिनीच्या पोटात हरवून गेलेला हा झरा पाहण्यास लोकांची गर्दी होत असून प्यास फौंडेशन ने चालवलेल्या या कामामुळे हे शक्य झाल्याने नागरिक आनंदी होत आहेत.
या गावाला फार वर्षांपासून एक तलाव होता पण अनेक वर्षे गाळ सुद्धा न काढल्याने तो भरला होता. लवकर त्यामधील पाणी संपत होते. तसेच गावाला पाण्याच्या समस्येला सामना करावा लागत होता, ही गोष्ट कळल्यावर यापूर्वी अनेक ठिकाणी जुन्या विहिरी व तलाव जिवंत केलेल्या प्यास फौंडेशन ने हे काम करायचे ठरवले.
10 एकर पेक्षा जास्त जागेत खुदाई करून नाला पूर्वी सारखा करण्यासाठी 25 लाख रुपये खर्च येणार होता, तेंव्हा मदत जमवण्याची मोहीम झाली, ए के पी फाऊंडरी चे पराग भंडारे यांनीही याला भरीव मदत केली आणि हा तलाव आता पावसाळ्याच्या पूर्वी तयार होणार असून पावसाळ्याचे पाणी त्यात साठवले जाईल.
हे काम सुरू असतानाच हा झरा सापडला आहे. पूर्वी मच्छे हे गाव तलावातील माश्यांसाठी प्रसिद्ध होते. रुचकर मासे मिळतात म्हणून गावाला तेच नाव पडले . अनेक झऱ्यांनी भरलेला तलाव होता, पण परिस्थिती बदलली आणि गावाला पाणी मिळणे सुद्धा अवघड झाले. या गावाला टँकर ने पाणी देऊन प्यास बुजवण्याचा निर्णय प्यास फौंडेशन ने घेतला होता पण असे करण्यापेक्षा हा तलाव जिवंत करून कायमचा उपाय करण्याचा निर्णय घेण्यात आला, हा उपाय यशस्वी झाल्यावर मच्छे ग्रामस्थांना अच्छे दिन येतील आणि पुन्हा येथील मच्छि प्रसिद्ध होतील अशी आशा करूया.