बेळगाव शहर आणि परिसरातील सर्व ग्रामीण भागात आज रविवारी दिवसभर आणि रात्रीही विजेचा खेळखंडोबा झाला आहे. हेस्कोम चे अधिकारी व कर्मचारी दिवसभर दुरुस्ती काम करत होते पण त्यांना यश आले नाही, इतक्यात रात्री साडे नऊ नंतर पुन्हा वादळी वारा आणि विजा चमकण्यास सुरुवात झाल्यामुळे रात्री परत वीज गेली आणि शहरवासीय अडचणीत आले.
काल शनिवारी दुपारी झालेला पाऊस, वादळी वारा आणि झाडांची पडझड याचा सर्वात मोठा फटका विद्युत पुरवठ्यावर बसला आहे. काल दुपारीच झाडे उखडून पडल्यामुळे अनेक ठिकाणी विजेचे खांब आणि वायर्स तुटल्या. ही रिपेरी करून सर्व व्यवस्था सुरळीत करण्यास काल मध्यरात्री पर्यंत कामे सुरू होती. आज पहाटे पासून पुन्हा काम करण्यात आले पण यश आले नव्हते.
आज दिवसभर ढगाळ वातावरण होते पण पाऊस पडला नाही पण रात्री उशिरा काही भागात वादळी वारा तर काही भागात पाऊस सुरू झाला आणि त्यामुळे पुन्हा वीज गायब झाली असून आता रविवारच्या दिवसा बरोबर रात्र सुद्धा अंधारात घालवावी लागणार आहे.
दुरुस्ती झालेल्या भागात वीज होती पण केबल कनेक्शन च्या वायर्स तुटल्याने आज दिवसभर टीव्ही बघता आलेले नाहीत, तर बऱ्याच ठिकाणी टीव्ही वर फक्त लोकल चॅनल वगळता दुसरे काहीही दिसले नाही यामुळे नागरिकांचा रविवार अत्यंत वाईट गेला आहे.