” मनोहर पर्रिकर ” साहेबांच्या बरोबर घालवलेला एक विमान प्रवास,
2013 मधील कहानी आहे. मी नैरोबी केनिया देशाला जात असताना माझे विमान गोव्याहून मुंबई व मुंबई येथून नैरोबी ला होते. आणि
मी बेळगावहून कार गाडीने गोव्याला जात असताना रस्त्यामध्ये एक छोटा अपघात झाला होता. आणि मला तर गोव्याच्या विमान तळाला जायचं होतं. काही केल्या रस्त्यावरची गर्दी सरकत नव्हती चार वाजून वीस मिनिटांनी माझे विमान हवेत भरारी घेणार होते. मला उशीर होणार आणि माझे बोर्डींग पास बंद होणार असं वाटत असताना शेवटी मी चार वाजता हवाईअड्डा वर पोहोचलो पण बोर्डिंग पूर्ण झाले होते, त्यामुळे मी ज्या विमानान मुंबईला जाणार होतो ते विमान मला मिळाले नाही.
मी खूप विचारात पडलो, हताश झालो. आता काय करायचं मी काउंटरवर चौकशी केली की अजून मुंबईला जाणारी विमाने आहेत काय ? त्याने सांगितले यानंतरची सर्व विमाने फुल्ल आहेत. मला काय करायचं सुचत नव्हतं एवढेच नव्हे तर मी गोवा ते बेंगलोर व बेंगलोर ते मुंबई सुद्धा तपासून बघितलं पण ते सुद्धा हवाई जहाज उशिरा होते. आणि माझे नैरोबीचे विमान बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी होते.
शेवटी मी पुन्हा प्रयत्न केला सहा वाजून दहा मिनिटांनी गोवा मुंबई जहाज होते. त्यामध्ये कोणीतरी शेवटच्या क्षणी आले नाहीत म्हणून एकच तिकीट शिल्लक आहे असं समजलं आणि मी ते ताबडतोब द्यायला सांगितले व मी ते मिळवले तेव्हा मला समजलं की वेळेला किती महत्त्व आहे ते….
नंतर बोर्डिंगला सुरुवात झाली व मी विमानामध्ये प्रवेश केला तर बाजूला कोण बसले होते यावर माझा विश्वास बसेना साहेब साहेब म्हणत मी
” मनोहर पर्रिकर ” साहेबांच्या पायाला हात लावून त्यांना नमस्कार केला, साहेबांनी माझ्या पाठी वरती व डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले असं काय करताय मी काय देव आहे का ? असं साहेब म्हणाले .
मलासुद्धा गहिवरून आले तुम्ही जनतेचे देव आहात असं म्हणून मी साहेबांच्या बाजूला स्थान ग्रहण केल तोच साहेबांनी विचारले कुठून आला आहात मी म्हणालो बेळगाव ते म्हणाले बेळगाव माझे खूप आवडते शहर आहे. तिथली माणसे सुद्धा मला खुप आवडतात तिथं माझे चांगले मित्र सुद्धा आहेत कोण म्हणून मी विचारले असता त्यातील एक नाव त्यांनी आदराने घेतले आदरणीय ” किरण ठाकूर ” साहेब असे म्हणाले मग मी सुद्धा ” किरण ठाकूर ” साहेब मामा यांच्या विषयी खूप सांगितले.
मामा सीमाभागातील जनतेचा एक तळमळता तारा आहे सीमाभाग महाराष्ट्रामध्ये विलिन व्हावा यासाठी त्यांनी व त्यांचे वडील कै बाबुराव ठाकुर यांनी दिलेले योगदान बेळगावकर सीमावासीय कधी विसरणार नाहीत.
अस मी आवर्जून सांगितलं. तसेच त्यांची लोकमान्य संस्था खूप झपाट्याने वाढत चाललेली आहे लोकमान्य ही संस्था तळागळातील सर्वसामान्य माणसांचे मन व मनगट बळकट करणारी ही संस्था आहे असं त्यांना मी आवर्जून सांगितलं.
” मनोहर पर्रिकर “साहेबांनी ही मामांचे खूप कौतुक केले.
नंतर तुझे नाव काय म्हणून मला विचारले मी सांगितलं ” गोपाळराव तुकाराम कुकडोलकर “. नंतर तू काय करतोस असे विचारले मी म्हणालो मी सिव्हिल इंजिनियर आहे आणि बांधकाम व्यवसायिक आहे. मुंबईला कशासाठी चालला आहात असे विचारले मी म्हणालो मी व माझे दोन साडू भाऊ एक परिवाहन खात्यामध्ये अधिकारी व एक नवनीत बुक्स व्यवसायिक आहेत. त्यांच्यासोबत मी नैरोबी केनिया ला जात आहे. आम्हाला वाइल्ड लाइफ प्राण्यांच्या सहवासामध्ये दहा दिवस घालवायचे आहेत. असे मी त्यांना सांगितलं. असं सांगितल्यानंतर साहेब फार खूष झाले आणि बोलता बोलता साहेब झोपी गेले ते मुंबई आली तेव्हाच उठले.
व नंतर विमानातून उतरताना बेळगावकर मी निघतो असे सांगून साहेबांनी मला निरोप दिला. हा निरोप इतक्या लवकर येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं आता तर निरोप या शब्दाची मला धास्ती वाटायला लागली आहे. आणि अशा या माणसाची असी एक्झिट होईल असं मला कधी वाटलं नव्हतं. जेव्हा साहेबांना या रोगाची लागण झाली तेव्हापासून मी सुद्धा घाबरून गेलो होतो.
कायम मनामध्ये त्यांच्याविषयी असलेला स्नेह, आदर, प्रेम त्यांनी लोकांच्या साठी केलेल काम भारताचे संरक्षण मंत्री असताना देशासाठी केलेले काम मला खुणावत होतं. गोव्याच्या जनतेने त्यांच्यावर ठेवलेला विश्वास आणि केलेलं प्रेम ही या माणसाची ओळख होती.
हे मुख्यमंत्री आहेत असं कधी वाटलंच नाही. मी माझ्या गोव्याच्या मित्रांना कायम विचारत होतो की साहेब कसे आहेत. साहेब आता बरे आहेत का.
पण एक दिवस असा आला की डॉक्टरांनी साहेबांना घरी घेऊन जाण्याचा सल्ला दिला तेव्हा मात्र माझा बांध फुटला. तेव्हापासून माझ्या हृदयाचे ठोके वाढतच गेले.
व कालच माझ्या सहकार्य मित्राने श्रीयुत गोपी किल्लेकर याने साहेबांची तब्येत काय बरी नाही असं सांगितले आणि आज ही बातमी खरी ठरली.
गोपाळराव तुकाराम कुकडोलकर
सिविल इंजिनियर व बांधकाम व्यवसायिक बेळगाव.