पित्त या शब्दाची व्युत्पत्ती मूळ शब्द ‘तप’ पासून झालेली आहे. तप म्हणजे उष्णता. पित्तात दोन्ही तत्वांचा समावेश आहे, ‘अग्नी’ आणि ‘जल’ तत्व. पित्ताचा प्रवाही गुण गतिशीलता दर्शवितो. अष्टांग हृदयम मध्ये पित्ताच्या सात प्रकारांचे वर्णन केले आहे:
पित्त हे किंचित तैलीय, भेदक, उष्ण, हलके, सुगंधी, प्रवाही आणि जलरूपी असते. पित्तामुळे चयापचय क्रियेला किंवा परिवर्तनाला चालना मिळते. पित्त पचन, शरीराचे तापमान स्थिर राखणे, दृष्टीय आकलन, त्वचेचा रंग आणि वर्ण, बुद्धी आणि भावना नियंत्रित करते.
पित्त दोषात असमतोल झाल्यास शारीरिक अनारोग्य, आजार आणि भावनिक समस्या तयार होतात.
तिखट, मसालेदार, अति आंबट किंवा अति खारट याच चवीचे थोडक्यात ‘चमचमीत’ स्वभावाने उष्ण, दाह निर्माण करणारे उदा. शेंगदाणे व त्याचे पदार्थ, तळून केलेले मसालेदार, फ्राय पदार्थ, हिरवी मिरची, खरडा, रेंझका, लोणची या स्वरूपातील तोंडी लावणे, आम्ल रसात्मक किंवा आंबवून केलेले पदार्थ म्हणजेच दही, ताक, बिअर, डोसा, ईडली, ढोकळा, जिलेबी, ब्रेड, चिंच, आंबट फळे, तसेच मिरी, लवंग, दालचिनी, ओवा, आले, लसूण यांचे अतिप्रमाणात सेवन, कोल्हापुरी व म्हटला जाणारा ‘कट रस्सा’ यांचे अतिप्रमाणात नियमित सेवन, चहा, कॉफी, तंबाखू, सिगरेट, मावा, गुटखा या उत्तेजकांचे सतत सेवन. याचबरोबर मासे, अंडी, मटण, चिकन, नियमित खाणे हे प्रामुख्याने कारणीभूत ठरतात.
काही वेळ वरील प्रकारचे अन्न पदार्थ टाळणार्या माणसांनाही पित्त प्रकोप आढळतो. अशावेळी अति चिंता, क्रोध, अति भय, जास्त जबाबदारी, तणाव इत्यादी मानसिक कारणे आढळते, तर सतत उष्णतेजवळ काम, उन्हात काम, रात्री सतत जागरण आणि स्त्रियांच्या बाबतीत विशेषत्वाने दिसणारे वारंवार केले जाणारे उपवास इत्यादी बाबी देखील कारणीभूत ठरतात .
प्राथमिक स्वरूपाच्या पित्त प्रकोपामध्ये तोंड कडू होणे, तोंडाला दुर्गंधी येणे, घशाशी आंबट येणे, पोटात, छातीत व घशात जळजळणे, संडास व लघवीची आग होणे, जळजळीत व कटू उलटी होणे ही लक्षणे दिसतात. अशी लक्षणे दिसतात .काही काळानंतर मळमळणे, जळजळ वाढणे, उमासे येणे, सतत डोके दुखणे, तोंडाला पाणी सुटणे, अन्नाचे पचन न होणे व श्रम केलेवाचून थकवा वाटणे अशी लक्षणे आढळतात.काही प्रकारात हिरवे, पिवळे दुर्गंधीत, अतिचिकट, कडू, खारट व तिखट अशा स्वरूपाचे पित्त उलटीवाटे बाहेर पडते. छाती, घसा, पोट या ठिकाणी आग होते. हातपाय गरम होऊन, ताप येतो, पोटात दुखते व उलटीनंतर आराम पडतो अशी लक्षणे दिसतात.
तर काही वेळा अशा व्यक्तींना अनियमित भूक लागणे, पोट फुगणे, पोट जड वाटणे, तोंडाला पाणी सुटणे, पोट गुडगुडणे, पोट दुखणे, कळ करून वारंवार दाहयुक्त, पातळ शेमयुक्त, दुर्गंधीत संडास होणे आणि या सर्वातही संडास साफ झाल्याची संवेदना नसणे ‘या लक्षणांनीयुक्त कोलायटीस’ हा विकार होतो. याचे स्वरूप अत्यंत जीर्ण असून त्याच्या दुष्परिणामी जसा काळ जाईल, तशी रोग प्रतिकार शक्ती कमी होत जाणे व वजन कमी होणे, तसेच तीव्र थकवा, निरुत्साह, पांडुरोग, अॅनिमिया हे विकार आढळतात.
उपचार:- जे खाल ते नियमित व व्यवस्थित खा. भरपूर जेवण घेण्यापेक्षा तीन-चार तासांनी थोडे थोडे खात राहा. म्हणजे त्याचे पचन होणे सोपे जाईल.बाहेरचे कच्चे (म्हणजे न शिजवलेले), उघडे अन्नपदार्थ खाऊ नयेत. म्हणजे उकळलेला चहा प्यावा पण बाहेरील लिंबू सरबत नको, त्यामुळे पोटामध्ये जंतुसंसर्ग होऊ शकते.अन्नपचन व्यवस्थित होण्यासाठी – नियमितपणे फिरणे, सोपे सोपे व्यायाम करणे, योगासने-प्राणायाम करणे चालू ठेवावे.
जेवणात पालेभाज्या, कोशिंबिरी आवर्जून घ्याव्यात. दिवसभरात दोन-तीन तरी फळे खावीत. जेवण, नाश्ता हलकाफुलका असावा. उदा. नाश्त्यात लाह्य़ा घेणे इत्यादी. गॅस निर्माण करणारे पदार्थ खाणे टाळावे. उदा. दूध व दुधाचे पदार्थ, डाळी, कडधान्ये, कोबी, मुळा, फ्लॉवर यासारख्या भाज्या, फळे, जर्दाळू, बेदाणे, केळी, बटाटे, काकडी व सफरचंद.तेलकट-तूपकट, तळलेले खूप चमचमीत मसालेदार पदार्थ टाळावेत. शीतपेय (cold drinks/ aerated drinks) टाळावीत. भराभरा व जास्त जेवू नये. पोटाचे व इतर व्यायाम नियमित करावे. याचं सोबत बरीच होमिओपॅथीक उपचार देखील उपलब्ध आहेत ज्यांचा उपयोग करुन या विकारावर सहज मात करता येते उदा. रोबिनिया , अॅसिड सल्फ ,नक्सवोमिका , कारबोव्हेज , ॲसाफिटिडा , इत्यादी.