कंग्राळ गल्ली कॉर्नर ,काकती वेस रोडवर एकाच वेळी कानठळ्या बसवणार पाच स्फोट झाल्याने आता शहरात अफवांना उत आला आहे. मात्र पोलीस दाखल झाले असून पूर्ण तपास होईपर्यंत कोणत्याही अफवांना थारा देऊ नका असे घटनास्थळी पोलीस सांगत आहेत.
या स्फोटांनी एकच धांदल उडाली होती. कॉम्प्लेक्स मधील दुकानातून हे स्फोट झाले आणि गजबजलेल्या काकती वेस मार्गावर धावपळ झाली आहे. हा मार्ग कायम गजबजलेला असतो.
चन्नामा सर्कल ते बेळगावची बाजारपेठ जोडणारा हा मार्ग असल्याने या मार्गावर सगळीकडे गजबज असते. किरकोळ भाजी विक्रेत्यांपासून इतर सगळे विक्रेते या मार्गावर मोठया संख्येने असतात. या साऱ्यांनी एकच धसका घेतला असून पोलीस त्यांना शांत करत आहेत.
माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून असून स्फोट होऊन आग लागल्याने प्रचंड धावपळ करणाऱ्या नागरिकांना त्यांनी शांत केले.
कॉम्प्लेक्सची तीन मजली इमारत असून बाहेर मोबाईलचे दुकान आहे. आतमध्ये बॅटरी व इतर वस्तू विक्रीचे दुकान होते अशी माहिती मिळाली असून संपूर्ण काकती वेस हादरले आहे.
याठिकाणी सिलिंडर चा स्फोट झाला असल्याचा ही अंदाज असून आग विझवण्याचे प्रयत्न अजूनही जोरात सुरू आहेत.
एकदम कानठळ्या बसवणाऱ्या या स्फोटांनी सायंकाळी 6 च्या सुमारास खळबळ माजली. सलग 40 मिनिटे ही आग विझवण्यात येत आहे.