विशाखापट्टणम येथे झालेल्या सीनियर राष्ट्रीय महिला वेट लिफ्टिंग स्पर्धेत हलग्याची कन्या अक्षता कामती हिने यश संपादन करत पुन्हा एकदा बेळगावचे नाव राष्ट्रीय पातळीवर उज्वल केले आहे.21 ते 28 फेब्रुवारी दरम्यान 71 व्या पुरुष तर 34 व्या महिला सीनियर वेट लिफ्टिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
केवळ 19 वर्षीय अक्षता हिने सीनियर मध्ये खेळत कांस्य पदकाची कमाई केली आहे.अक्षताचे वजन 67 किलो असले तरी तिला 76 किलो वजनी गटात खेळ केला तिने 74 आणि 112 असे एकूण 186 किलो वजन उचलले तिसरा क्रमांक पटकावला. या गटातील सुवर्ण आणि रौप्य पदक विजेत्या खेळाडूंची वये अनुक्रमे 26 आणि 29 आहेत त्या तुलनेत कमी वयात सिनीयर गटात कांस्य पदक मिळवणारी खेळाडू म्हणून अक्षता कडे पाहिले जात आहे.
मागील महिन्यात झालेल्या खेलो इंडिया ज्युनिअर वेट लिफ्टिंग मध्ये सुवर्ण पदकाची तिने कमाई केली होती या नंतर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिची दखल घेत मन की बात या कार्यक्रमात तिचे खास कौतुक केलं होतं.हलगा येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या अक्षता हिने वेटलिफ्टिंग सारख्या खेळात राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी करत असल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.