त्यांच्यातील बेकिने सलग तीन वेळा जनतेचे नुकसान केले. ते एक झाले असते तर सलग तीन वेळा बेळगाव ग्रामीण मध्ये समितीचा आमदार झाला असता. मात्र मामा-भाच्याच्या वैराच्या राजकारणात सीमावर्ती यांचे नुकसान करण्यात आले. एक जण समितीत आहे तर दुसरा राष्ट्रीय पक्षात गेला आणि आता असे ऐकायला मिळत आहे की ते दोघे एक होत आहेत.
तशा प्राथमीक बैठकी झाल्या आणि दोघांनी वैरत्व विसरण्याचा निर्णय घेतला आहे. एकी होतेय यात दुःख वाटून घेण्यासारखे काही नाही मात्र त्यांच्या एक होण्याने जनतेचे झालेले नुकसान भरून येणार नाही .उलट लोकसभेच्या तोंडावर दोघांचाही आर्थिक लाभ होणार हेच सूत्र यामध्ये दिसत आहे .
महाराष्ट्र एकीकरण समितीची अधिकृत उमेदवारी मलाच पाहिजे असा हट्ट धरलेल्या दोघांनी 2008 आणि 2014 असे तीन वेळा आपल्या मराठी भाषेचा मान सन्मान आणि वर्चस्व धुळीला मिळवले .सत्ता आपल्या हातात यायला पाहिजे या एकाच ध्येयाने एकमेकांच्या विरोधात कुरघोडीची राजकारणे केली. यात दोघेही हरत गेले. हरल्यानंतरही एकाने किती पैसे खाल्ले आणि दुसरा कसा एकनिष्ट याच्या चर्चांवर वाद-विवाद वाढतच जात होते.
एक निवडणुकीत चुकले दुसऱ्या निवडणुकीत शहाणे होतील अशी भावना नागरिकात होती. मात्र सलग तीन निवडणुकात त्यांनी शहाणपणा दाखवला नाही एकाला शह देण्यासाठी दुसऱ्याने राष्ट्रीय पक्षात जाऊन तिथे उमेदवारी मिळवण्याचा प्रयत्न केला. मात्र समिती सोडून गेलेल्या त्या व्यक्तीला राष्ट्रीय पक्षात मान मिळेना झाल्यावर आता पुन्हा आम्ही दोघे एक होणार अशी चर्चा सुरू झाली. या चर्चमध्ये दोघांच्याही पाठीशी थांबलेले सामान्य कार्यकर्ते मात्र भरडून जात आहेत.
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हे राजकारण असल्याची चर्चा त्यांच्याच कार्यकर्त्यांनी सुरू केली आहे. दोघांनीही वेगवेगळ्या भागात कार्यकर्त्यांना जमवून आपली शक्ती दाखवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. रिंग रोडचे कारण दाखवून आंदोलनाचा इशारा देत लोकसभेत आपले खिसे जास्त प्रमाणात भरुन घेण्याची तयारी दोघांनी सुरू केली असून सर्वसामान्य समिती कार्यकर्ते मात्र समिती अस्मितेपोटी त्यांच्या पाठीमागे लागले या परिस्थितीत राष्ट्रीय पक्षातून घरवापसी होणार की एक झाल्यानंतर समितीत असलेला दुसरा आता त्या पक्षातल्या व्यक्तीला मदत करणार? अजून उघड झाले नसले तरी त्याची चर्चा मात्र जोरात सुरू आहे.
बेळगाव तालुक्याच्या पश्चिम भागातील एका गावात हे दोघे एकमेकांसमोर आले .त्यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचे फोटो काढले आणि चर्चा जोरात सुरू झाली. एकमेकांच्या जवळ यायला उशीर झाला अशी चर्चा सुरू आहे उशिरा का होईना शहाणपण आले. ते जनतेच्या कल्याणासाठी यावे अशी भावना आहे. मागच्या लोकसभेत वाटलेल्या पैशांची चर्चा होत असतानाच यावेळी एकी करून पैसे खाण्याचा प्रकार करू नये अशीच सामान्य समिती कार्यकर्त्यांची इच्छा आहे.