पंतप्रधान नरेंद्र मोदी विरोधी राजकारणात विविध पक्षांनी आपली आघाडी स्थापली आहे. या आघाडीत काँग्रेस, राष्ट्रवादी, निधर्मी जनता दल आणि तृणमूल काँग्रेस सारख्या अनेक पक्षांनी हात मिळवणी केली आहे. कर्नाटकात भाजपचा पाडाव करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणूक काँग्रेस आणि जेडीएस अशा संयुक्त युतीतून लढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .
काँग्रेस आणि जेडीएस मध्ये जागा वाटपावरून काही वाद आतापासूनच दिसत असून कुठल्या जागा कुणाला आणि कुणाला किती जागा याचे गणित जुळवण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते शरद पवार मध्यस्थी करणार असल्याची माहिती मिळत आहे.12 रोजी बेळगाव येथील कडोली येथील शिव पुतळ्याच्या उदघाटन समारंभात शरद पवार मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी एकत्र असणार आहेत या पवार यांच्या दौऱ्यात याबाबत चर्चा होऊ शकते.पवार यांच्या सोबत सतीश जारकीहोळी, प्रकाश हुक्केरी साताऱ्याचे उदयन राजे भोसले देखील या कार्यक्रमात सहभागी होण्याची शक्यता आहे.
कोणत्याही परिस्थितीत भाजपला जास्त जागा मिळवून द्यायच्या नाहीत हा आघाडीचा प्रमुख उद्देश आहे यामुळे प्रत्येक राज्यात वेगवेगळी रणनीती आखण्याचा निर्णय या आघाडीतील प्रमुख पक्ष काँग्रेसने घेतला आहे .सर्व ठिकाणी युतीतून लोकसभेचे उमेदवार ठरवताना जागा वाटपाचे गणित ठरवताना तिढे निर्माण होत आहेत. ते सोडवण्यासाठी दिग्गज नेत्यांची नियुक्ती करण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे म्हणूनच कर्नाटकातील अशाच होऊ घातलेल्या समस्या सोडवण्यासाठी शरद पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जेडीएस आणि काँग्रेसमध्ये कर्नाटकात आतापासूनच वाद सुरू आहे. कर्नाटकात या दोन्ही पक्षांचे संयुक्त सरकार आहे. याच माध्यमातून लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरू आहे. कर्नाटकात लोकसभेचे २८ मतदारसंघ आहेत यापैकी बारा ठिकाणी आपल्याला काँग्रेसने वाट मोकळी करून द्यावी अशी मागणी जेडीएस चे नेते माजी पंतप्रधान देवेगौडा यांचे सुपुत्र मुख्यमंत्री एच डी कुमारस्वामी यांनी केली आहे . काँग्रेस लोकसभेला जेडीएस साठी १२ जागा सोडण्यास तयार नाही याचा फटका काँग्रेसला बसू शकतो यामुळे योग्य वेळेत मध्यस्थी होण्याची गरज आहे. कर्नाटकातील काँग्रेस व जेडीएस चे नेते शरद पवार यांना मानतात कुमार स्वामी यांच्या शपथविधीला शरद पवार यांना खास आमंत्रित करण्यात आले होते शिवाय आघाडी म्हणून हात मिळवणी झाल्यामुळे काँग्रेसचे नेते शरद पवार यांना आणि त्यांच्या शब्दाला मान देतात यामुळे कोणतेही नुकसान होऊ न देता मध्यस्थी करून भाजपला जास्तीत जास्त फटका बसवण्याच्या दृष्टीने योग्य म्हणून पवार यांच्याकडे पाहिले जाते.
शरद पवार यांची गोष्टच वेगळी आहे आता ते मोदी विरोधी आघाडीत असले तरी केंद्रीय पातळीवर पासून राज्या राज्यापर्यंत भाजपचे नेते शरद पवार यांना मानत आले आहेत. हाच त्यांचा सल्ला घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी बारामतीला येऊन गेल्याचे उदाहरण ताजे आहे अशा वातावरणात त्यांची झालेली निवड जेडीएस आणि काँग्रेसमधील अंतर्गत वाद मिटवून लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा मिळवण्यात उपयोगी ठरेल असे राजकारणाचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तींना सध्या तरी वाटत आहे.