ग्रामपंचायत अध्यक्षाने त्याच्या सहकारी सदस्याचा खून केल्याची घटना काकतीजवळील न्यू वंटमुरी येथे गुरुवारी रात्री घडली.
अध्यक्षाने तिघांवर काठीने डोक्यात हल्ला केला असून यापैकी एक जण ठार झाला, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बेन्याप्पा पाटील असे मृत ग्राम पंचायत सदस्याचे नाव आहे.
न्यू वंटमुरी येथे ग्रामपंचायत अध्यक्ष शिवाप्पा वन्नूरे व ग्रामपंचायत सदस्य बनाप्पा ( वय ४२) यांच्यामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून अध्यक्षपदाच्या खुर्चीसाठी अंतर्गत धुसफूस होती. गुरुवारी रात्री नऊच्या सुमारास या दोघांमध्ये पुन्हा भांडण सुरु झाले. यावेळी संशयित ग्रामपंचायत अध्यक्ष शिवाप्पाने बेन्याप्पा यांच्यावर काठीने वार केला. यावेळी बेन्याप्पाचे दोघे नातेवाईक तरुण महांतेश व प्रशांत भांडण सोडवण्यासाठी गेले असता शिवाप्पाने या दोघांवरही हल्ला केला. डोक्यावर काठीचा वर्मी घाव बसल्याने तिघेही गंभीर जखमी झाले.
त्यांना खासगी रुग्णालयात दाखल केले असता बेन्याप्पाचा उपचार सुरू असताना गुरुवारी रात्री अकरा वाजता मृत्यू झाला. दोघांवर उपचार सुरू असून दोघांचीही प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले. काकती पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. काकतीचे पोलिस निरीक्षक श्रीशैल कौजलगी अधिक तपास करीत आहेत.