काळा दिन आणि मराठीपणाची अस्मिता आजही मागील 63 वर्षापासून कायम आहे. मनात धगधग आणि मराठीचा बोलबाला तसेच भगवा झेंडा अटकेपार लावण्यासाठी आजही बेळगावकर मराठी माणूस झगडताहेत आणि लढत आहेत केवळ आपल्या हक्कासाठी. १ नोव्हेबर हा काळा दिन गांभीर्याने पाळला जातो. त्यामुळे कर्नाटक आणि केंद्र सरकारच्या उरात धडकी भरविण्यासाठी बेळगाव लाईव्हच्या माध्यमातून आवाहन करावेसे वाटते या आणि मोठ्या संख्येने सहभागी व्हा. लढा नाहीतर गुलामीची सवय होईल.
१९५६ सालापासूनची उरी असणारी धग आजही जागी आहे. मागील ६३ वर्षांपासून येथील मराठी माणसावर होणारे अन्याय आणि आगपाखड यामुळे त्रासलेल्या आणि गुदमरलेल्या आवाजाला वाचा फोडण्यासाठी एकजुटीने मूक सायकल फेरीत सहभागी होण्याची गरज आहे. हौतात्म्य पत्करलेल्या साऱ्यांनाच श्रद्धांजली वाहण्यासाठी म्हणून या फेरीत सहभागी होण्यासाठी सज्ज रहा.
युवा पिढी तर आतापासून सज्ज झाली आहे. १ नोव्हेंबरच्या तयारीत अनेकजण गुंतले आहेत. मात्र काही बागुलबुवा जे राष्ट्रीय पक्षाच्या खिदमतीत अडकले आहेत त्यांनीही मराठी अस्मितेचा विचार करण्याची गरज आहे. जर राष्ट्रीय पक्षाच्या नादी लागून आपली अस्मिता गहाण ठेवत असणाऱ्यांनी एकदा मागे वळून पाहण्याची गरज आहे. यामुळे उठा आणि सामील व्हा, एकदा राष्ट्रीय पक्षांच्या उरात धडकी भरवा, असे आवाहनही करण्यात येत आहे.
मागील ६३ वर्षांपासूनची असणारी सल १ नोव्हेंबर रोजी बाहेर काढून आपला मराठी बाणा दाखविण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे मूक सायकल फेरीत मोठ्या संख्येने सहभागी होऊन मराठीची डरकाळी फोडण्यासाठी एकच गर्जना करा…. या आणि सामील व्हा…
*शांतता पाळा*
काळ्या दिनाच्या मूक सायकल फेरीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या युवा कार्यकर्त्यांना बेळगाव live चे आवाहन आहे ही फेरी मूक आहे तेंव्हा त्या फेरीत मूक पणेच सहभागी व्हा. शांतता पाळा कुठल्याच घोषणा देऊ नका. समितीने आजवरचे आंदोलन हे पूर्णपणे लोकशाही मार्गाने चालवले आहे म्हणून फेरीत कोणतीच चुकीची घोषणा किंव्हा कृत्य करू नका.
गोंधळ घालण्यासाठी भाडोत्री गुंड पाठवून चुकीची कृत्ये करून घेतला जाण्याचा संशय आहे. उगीच कुणीतरी चुकीच्या घोषणा देणे किंव्हा दगडफेक सारखे कृत्य करत असल्यास त्या व्यक्तीस पोलिसांच्या स्वाधीन करा आणि फेरीस गालबोट लागू देऊ नका.
कर्नाटक पोलिसांनी पुन्हा एकदा गळचेपी केली आहे. चोर तर चोर, वर शिरजोर!